

Pachgani News : पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी आता आठ, तर 20 नगरसेवकांसाठी 75 उमेदवार रिंगणात उरले आहेत. अनेक प्रभागांमध्ये तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे पाचगणी निवडणुकीचे रणांगण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत होत आहे. यामुळे अनेकांच्या नजरा आता प्रभागातील उमेदवारांकडे लागून राहिल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी प्रचाराच्या फैरी झडू लागल्या आहेत. आप्तस्वकीय, पाहुणेरावळ्यांची शोधाशोध करून, मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी आपल्याच बाजूने मतदान करावे, यासाठी मनधरणीची प्रक्रिया जोरदार सुरू झाली आहे.
या निवडणुकीत मुख्य लढत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माजी नगराध्यक्षा लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांच्यातच होत आहे. राष्ट्रवादीचे दिलीप बगाडे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, तर लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या गटाचे संतोष कांबळे हे उमेदवार आहेत. या दोघांनाही तसे पाहिले, तर लढत सहज सोपी नाही. त्यांना पत्रकार सुनील कांबळे, सुनील बगाडे, दीपक कांबळे यांनी आव्हान दिले आहे.
प्रभाग क्रमांक एकमध्ये लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे चिरंजीव वैभव कऱ्हाडकर यांनी माजी नगराध्यक्ष किरण जानकर यांना आव्हान दिले आहे. या दोघांमध्ये पारस परदेशी आणि संतोष कदम या नवख्या उमेदवारांनी प्रवेश केल्याने ही चौरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे. दुसऱ्या लढतीत माजी नगरसेविका राजश्री सणस यांना प्रतिभा धनावडे आणि प्रतीक्षा कासुर्डे यांचा सामना करावा लागणार आहे.
प्रभाग दोनमध्ये माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामणे आणि माजी नगरसेविका सुलभा लोखंडे यांना नव्या दमाच्या हरीश गोळे यांनी आव्हान उभे केले आहे. यामध्ये हरीश गोळे यांना सर्व नेत्यांकडून माघारीसाठी मनधरणी चालू होती परंतु त्यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण आहे. एकेकाळचे दोन मित्र आता एकमेकांविरोधात ठाकल्याने या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. दुसऱ्या लढतीत मात्र सुप्रिया महेश माने आणि सोनल घाडगे या नवख्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढत होत आहे.
प्रभाग तीनमध्ये रूपेश बगाडे, आकाश बगाडे, विवेक परिहार, अजय सपकाळ यांच्यात चौरंगी लढत होत आहे. यामध्ये रूपेश बगाडे या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याला मोठे आव्हान असल्याने त्यांची ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे, तर दुसऱ्या लढतीत माजी नगरसेविका आशा बगाडे यांना आरती साळुंखे, विमल भिलारे, प्रियंका जाधव, प्रीती आंब्राळे यांच्याकडून कडवे आव्हान मिळाले आहे.
प्रभाग चारमध्ये माजी नगराध्यक्षा परवीन मेमन यांच्याशी भाजपच्या नम्रता बोधे यांनी टक्कर घेतली आहे, तर दुसऱ्या लढतीत माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांना भाजपच्याच मंगेश उपाध्याय यांनी आव्हान उभे केले आहे. या लढतींमधून दोन माजी नगराध्यक्षांना भाजपशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजपने (BJP) या दोन्ही नेत्याने टार्गेट केले आहे.
प्रभाग पाचमध्ये माजी नगरसेविका उज्ज्वला महाडिक यांना माजी नगरसेविका रेखा जानकर, गायत्री कासुर्डे, राजश्री प्रभाळे, शिल्पा माने आणि भाजपच्या मेघना बाचल यांच्याशी लढावे लागत आहे, तर दुसऱ्या लढतीत प्रसाद कारंजकर, अजित कासुर्डे, सुनील बिरामणे आणि शहानवाज चौधरी या सर्व नव्या दमाच्या उमेदवारांमध्ये सामना रंगत आहे. त्यामुळे येथून एक नवा चेहरा पालिकेत प्रवेश करणार आहे.
प्रभाग सहामध्ये माधुरी कासुर्डे, साधना कासुर्डे, प्रतीक्षा कासुर्डे आणि प्रियांका जायगुडे या चार नवख्या उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहे. यामध्ये कासुर्डे तिन्ही महिला एकाच भावकीतील आहेत. यामध्ये माधुरी कासुर्डे विरुद्ध भाजपच्या साधना कासुर्डे यांच्यात सामना रंगणार आहे, तर दुसरीकडे माजी नगरसेवक विनोद बिरामणे यांना युवा नेता गणेश कासुर्डे आणि भूषण बोधे यांनी आव्हान दिले आहे. यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. ही लढत मात्र हाय व्होल्टेज ठरणार आहे.
प्रभाग सातमध्ये माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर आणि राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनिता चोपडे यांच्यात दुरंगी; पण लक्षवेधी लढत होत आहे. कऱ्हाडकर यांच्या अर्जावर चोपडे यांनी हरकत घेतल्याने कऱ्हाडकर यांनी दुसऱ्या प्रभागात अर्ज भरून सावध पवित्रा घेतला; पण निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने त्या आता या प्रभागातून जास्तीतजास्त मते घेण्याचा प्रयत्न करतील. दुसऱ्या लढतीत माजी नगरसेवक प्रवीण बोधे यांना राजेंद्र पारठे यांनी आव्हान दिले आहे. यामध्ये बोधे यांचा अनुभव कामी येतो, की पारठे त्यांच्यावर मात करतात हे दिसून येणार आहे.
प्रभाग आठमध्ये सचिन मोरे, नरेश लोहारा, अमित कांबळे, सुनील खरात, किरण रणपिसे, रविराज देखणे यांच्यात लढत होत आहे. ‘ब’मध्ये लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या स्नुषा अभिलाषा कऱ्हाडकर यांना प्रीती पिसाळ, साबेरा सय्यद, रीना कांबळे यांनी आव्हान दिले आहे. या लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग नऊमध्ये माजी नगरसेविका सरोज कांबळे यांना स्वाती कांबळे, आशा वन्ने, सुषमा मोरे, करुणा काकडे, सुचित्रा आव्हाडे यांनी आव्हान दिले आहे. एकाच प्रभागातील या महिला असल्याने घराघरांतील मत विभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर येथील निकाल अवलंबून असेल. दुसऱ्या लढतीत प्रकाश गोळे, रंजन कांबळे, अर्जुन जेधे, माजी नगरसेवक हेनरी जोसेफ, जॉन जोसेफ, दिलीप टेके यांची लढत रंगणार आहे.
प्रभाग 10 मध्ये माजी नगरसेवक दिलावर बागवान यांना महेश खांडके, नामदेव चोपडे, योगेश जानकर यांनी आव्हान उभे केले आहे, तर दुसऱ्या लढतीत अमृता प्रकाश गोळे आणि शशिकला कासुर्डे या दोघींमध्ये दुरंगी लढत होत आहे.
माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव वैभव कऱ्हाडकर आणि स्नुषा अभिलाषा वैभव कऱ्हाडकर हे एकाच घरातील तीन सदस्य विविध प्रभागांत लढत आहेत, तर रूपेश बगाडे आणि आशा बगाडे, प्रकाश गोळे आणि अमृता गोळे, माजी नगराध्यक्ष किरण जानकर आणि माजी नगरसेविका रेखा जानकर अशी तीन दांपत्ये नगरसेवक, नगरसेविका पदासाठी मैदानात उभे आहेत. नगराध्यक्षपदासाठी संतोष कांबळे आणि दीपक कांबळे हे दोघे सख्खे भाऊ, तसेच दिलीपभाऊ बगाडे आणि संतोष कांबळे हे सासरे-जावई, दिलीप बगाडे आणि सुनील बगाडे चुलते पुतणे असे घराघरांतील उमेदवार रिंगणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.