

Karad, 19 May : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागलेल्या रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. राजकीय जुळवाजुळव आणि बेरजेचे राजकारणाने सध्या वेग घेतला आहे. कारखान्यातील सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या गटाने समविचारी शक्तींना एकत्र आणण्याची रणनीती आखत उंडाळकर गटाला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनीही उंडाळकर गटाशी संपर्क वाढवला असून, त्यामुळे कृष्णाच्या निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
सातारा-सांगली जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणूक दरवेळी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरते. कृष्णाकाठच्या राजकीय प्रवाहावर या निवडणुकीचा प्रभाव पडत असल्याने सर्वच गटांनी तयारी सुरू केली आहे. २०२१ च्या निवडणुकीत सत्ताधारी डॉ. भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवत वर्चस्व राखले होते. त्या वेळी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलसह माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलमध्ये तिरंगी लढत झाली होती.
यावेळच्या निवडणुकीसाठी ५० हजार २५२ सभासद मतदान करणार असून, येत्या २१ जूनला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाने अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला मदत केली होती. मात्र, यावेळी त्यांनी अद्याप कोणालाही उघड पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे दोन्ही गटांनी उंडाळकर गटावर लक्ष केंद्रित केले आहे.
अलीकडेच उंडाळकर यांच्या रयत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये यापूर्वीच्या कारखाना निवडणुकीचे अनुभव, बाजार समिती, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांतील बदलती राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते. काही पदाधिकाऱ्यांनी ‘प्रवाहाबरोबर राहिले पाहिजे,’ असे मत व्यक्त केल्याची चर्चा आहे. मात्र, तो प्रवाह नेमका कोणता? याबाबत स्पष्टता नसल्याने उंडाळकर गट सध्या तरी ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
कराड दक्षिणच्या राजकारणाची दिशा ठरणार
कृष्णा कारखान्याची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून, ती कऱ्हाड दक्षिणेतील आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरेल. विधानसभा निवडणूक नसतानाही स्थानिक गट आणि पक्ष या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. उंडाळकर गट कोणत्या बाजूला झुकतो, यावर भविष्यातील तालुकास्तरीय समीकरणांची दिशा ठरणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी विरोधक एकत्र येणार की, पुन्हा मतविभाजन होणार? याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.