Kolhapur Latest News : ऐन दिवाळीत कोल्हापुरात बिद्री कारखान्याच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटत आहेत. मेहुण्या-पाहुण्यांचं जुळणार की फाटणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष होते. मात्र, तो प्रश्न आता निकाली लागला आहे. बिद्रीच्या राजकारणात मेहुण्या-पाहुण्यांचे फिसकटले असून, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटासोबत राहणार असल्याचे समोर आला आहे. त्याबाबतची घोषणा आज सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत होणार आहे. सत्ताधारी माजी आमदार के. पी. पाटील गटाला हा धक्का मानला जात आहे. तीन आठवड्यांपूर्वी 'सरकारनामा'ने ए. वाय. पाटील यांच्याबाबतीत अंदाज दिला होता, तो खरा ठरला आहे.
कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारणातील अंदाज बांधणे मुश्कील होत चालले आहे. मागील वेळी राष्ट्रवादीने भाजपसोबत हात मिळवत बिद्री कारखान्यावर सत्ता काबीज केली होती. त्यामध्ये माजी आमदार के. पी. पाटील, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ए. वाय. पाटील यांचा समावेश होता. मात्र, यंदा मेहुण्या-पाहुण्यांचे फिसकटल्याने ए. वाय. पाटील कोणासोबत राहणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
बिद्री कारखान्याच्या निमित्ताने के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करूनही त्यांच्यातील संघर्ष मिटण्याचे चिन्ह नाहीत. अशात ए. वाय. पाटील यांनी के. पी पाटील यांना धक्का दिला आहे. ए. वाय. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाच्या छावणीत जाऊन के. पी. पाटील यांना टक्कर देण्याचे ठरवले आहे. खासदार संजय मंडलिक, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर व ए. वाय. पाटील विरुद्ध माजी आमदार के. पी. पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात बिद्रीचे राजकारण पेटणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बिद्रीच्या राजकारणात के. पी. विरुद्ध ए. वाय. असा राजकीय संघर्ष विकोपाला गेल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. केपी आणि ए. वाय. हे दोघे एकच असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खुल्या व्यासपीठावर सांगितले होते. मात्र, ए. वाय. पाटील यांनी थेट मुश्रीफ यांच्या जवळ जाऊन आपल्यावर होत असलेला अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. राधानगरी तालुक्यातील संचालक मंडळाच्या सर्व सहा जागांची आणि बिद्रीचे अध्यक्षपद यावर तोडगा निघत नसल्याने माझे आपल्याशी जमत नसल्याचा निरोप मंत्री मुश्रीफ यांना दिला.
माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासोबत बिद्रीच्या राजकारणात ए. वाय. पाटील यांचे फिसकटल्यानंतर पाटील यांनी थेट आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत बिद्रीवर परिवर्तन करण्याचा डाव शिंदे गटासह भाजपचा आहे. त्यामुळे बिद्रीच्या राजकारणातील आघाडीचा नेता आबिटकर गटाला मिळाल्याने हा माजी आमदार के. पी. पाटील आणि मुश्रीफांना धक्का मानला जातो. आज सायंकाळी ए. वाय. पाटील हे आबिटकर गटासोबत राहणार असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत कोल्हापूरचे भाजप-शिंदे गटाचे नेते पत्रकार परिषदेत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.