

कोल्हापूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांना विकासकामाच्या आभार फलकावरून झालेल्या वादातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, धमकी देणाऱ्या व्यक्तीने "मी मोकातून सुटलो आहे, अजून एक गुन्हा अंगावर घ्यायला तयार आहे," असे म्हणत धाक दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
देवकर पाणंद परिसरातील खासदार निधीतून मंजूर झालेल्या सभागृहाच्या कामाबाबत उभारण्यात आलेल्या आभार फलकावरून हा वाद सुरू झाला. नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांचे आभार मानणारा फलक उभारला होता. त्याच फलकावर माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांच्या मुलाच्या नावाचा स्वतंत्र फलक लावण्यात आल्याने खाडे यांनी याबाबत रामुगडे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर संबंधित फलक बाजूला काढण्यात आला. याच कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी रामुगडे यांचे जावई आकाश अशोक कदम यांनी विजयसिंह खाडे यांना फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आयटीआय परिसरातील खाडे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन, "तुम्ही माझे सासरे सुभाष रामुगडे यांना शिवीगाळ का केली?" असा जाब विचारला.
खाडे यांच्या तक्रारीनुसार, यावेळी आकाश कदम यांनी स्वतःवर यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई झाल्याचा उल्लेख करत, "मी मोकातून सुटलो आहे, अजून एक गुन्हा अंगावर घ्यायला तयार आहे," असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर विजयसिंह खाडे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आकाश अशोक कदम यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, विकासकामांच्या श्रेयवादावरून सुरू झालेला वाद थेट धमकीपर्यंत पोहोचल्याने कोल्हापूरच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.