-राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत कारवाई होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या राजकीय दबावामुळे आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप पोटरे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे आरोपींवर मोक्का अंतर्गत तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सचिन पोटरे हे भाजप आमदार राम शिंदे यांचे निकटचे आणि विश्वासू कार्यकर्ते आहेत. 2019 ला झालेल्या निवडणुकीत रोहित पवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत राम शिंदेंना पराभूत केले. तेव्हा पासूनच आमदार शिंदे आणि आमदार पवार यांच्यात मोठा राजकीय संघर्ष विविध कारणांनी दिसून येतो. त्याचा काही परिणाम दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षात दिसून आला आहे.
याच अनुषंगाने आता सचिन पोटरे यांनी आपल्यावर आणि कुटुंबियांवर रोहित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याची तक्रार जून महिन्यात कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र पोलिसांनी रोहित पवार यांच्या दाबावातून माझ्यावरही खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पोटरे यांनी केला आहे. पवारांच्या दाबावातून तक्रार दाखल असलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत नसल्याचे पोटरे यांनी म्हटलं आहे.
हल्ला करणारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुंड कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात रोज वावर असतो. मागील महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अनेकदा तक्रारी करूनही पोलीसांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे धाडस केलेले नाही. मात्र आता फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देत तक्रार दाखल असणाऱ्या कार्यकर्त्यांना मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंती पोटरे यांनी तसेच कर्जत भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रोहित पवार व राष्ट्रवादीच्या विरोधात सोशल मिडीया, वृत्तपत्रातमध्ये सातत्याने पोटरे हे विधायक टिका करीत असता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना त्यांच्या घरी येऊन सचिन पोटरे व त्यांच्या कुटूंबीयांवर सहा ते सात जणांनी हल्ला केला. याबाबतची तक्रार पोटरे यांनी दाखल केली आहे. त्यांच्याच घरी येऊन त्यांच्यावर हल्ला करुन रोहित पवार यांच्या दबावाने सचिन पोटरे आणि त्यांच्या कुटूंबावर देखील पोलीस प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप निवेदनात केलाआहे.
पोटरे यांच्या सहित अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी, दादागिरी व दहशत करून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील अनेकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे देखील दाखल असून या सर्वांचे अवैध व्यवसाय चालू आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर ही टोळी सक्रीय असून व्यक्तीगत पातळीवर येऊन अनेकांची बदनामी करण्याचा व आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो व यावरही परिणाम झाला नाही तर मग समाज माध्यमांवर, फोनवर व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जाहीर धमक्या देऊन प्रसंगी मारहाण करुन आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. असे फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
(Edited By : Mangesh Mahale)