
Sangli News : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या नव्या विधानामुळे वाद उफाळण्याची शक्यता असून यापूर्वीही शेतकऱ्यांना 'भिकारी' म्हणत वादाला तोंड फोडले होते. आता त्यांनी अवकाळीसह मान्सून पूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिसाला न देता 'हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?' असा सवाल करत वाद निर्माण केला आहे. ज्यामुळे आता राज्यभर शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. याच वक्तव्याव्यावरून भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील तिखट प्रतिक्रिया देत महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात केली. यावेळी त्यांनी, नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल केला होता. तसेच त्यांनी जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. ते नियमात बसत नाही. शेतातील पिकांचेच रीतसर पंचनामे होतील, असेही स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून राज्याभर असंतोष पाहायला मिळत आहे.
याच वक्तव्यावरून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीला घरचा आहेर दिलाय. तसेच कृषिमंत्री कोकाटे यांनी बाजू देखील सावरताना कान देखील टोचले आहेत. यावेळी खोत यांनी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वेगवेगवळे मंत्री नुकसानीचे पाहणी करण्यासाठी दौरे करत आहेत. शेतकर्यांच्या बाबतीत संवेदना बाळगून काम करणे आवश्यक आहे. एखाद्या पदावर गेल्यावर आपले काम नेमके काय आहे? काय आपली दिशा आहे? हे स्पष्ट असणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
तसेच कोकाटे असोत किंवा दुसरे कुणी मंत्री त्यांनी बोलताना भान राखणे गरजेचे आहे. माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषीमंत्री आहेत. ते ग्रामीण भागातील आहेत. पंचनामे करणार नाही अथवा नुकसान भरपाई देणार नाही, असे त्यांनी म्हटलेलं नाहीत, असे म्हणत कोकाटेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न खोत यांनी केला आहे. पण अलीकडच्या काळात मारा आणि झोडा या प्रमाणे अनेक वक्तव्ये दाखवली जातात. परंतु कृषी मंत्र्यांनी देखील शेतकर्यांवर भाष्य करताना संवेदनशील राहून भाष्य करावे, असेही कान खोत यांनी टोचले आहेत.
दरम्यान कृषिमंत्र्यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. 'कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटील की? कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का?" या वादग्रस्त वक्तव्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनात प्रतिकात्मक गाढवाच्या गळ्यात कृषिमंत्र्यांचे पोस्टर लावून आणि 'मी हिटलर कृषिमंत्री', 'मी गाढव कृषिमंत्री' असे बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर अशी विविध वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही युवा सेनेने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.