Phaltan News : मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून जावी, अशी आपण पंतप्रधानांकडे केलेली मागणी मान्य झाली आहे. लवकरच त्यास तांत्रिक मंजूरी मिळेल, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर Ranjitsinh Nimbalkar यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कर्तुत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या दिर्घायुष्यासाठी आपण पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, शिंगणापूर आदी प्रसिध्द मंदिरांत अभिषेक घालून तेथील प्रसाद घेवून पंतप्रधानांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातुन जावा, अशी विनंती आपण केंद्रिय रेल्वेमंत्री व पंतप्रधानांना भेटून व पत्राद्वारे केली होती. ती मान्य करून माळशिरस, अकलूज, पंढरपूर मार्गे सोलापूरहुन हैदराबादकडे जाणारा आहे, हा प्रकल्प एनएचआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला सादर करण्यात आला.
त्याचा पीएफआर रिपोर्ट व डिपीआर रिपोर्ट झाला आहे व टेक्निकल सर्वेही चालक विरहित विमानातून झाला आहे. रेल्वे मंडळाला डीपीआर सादर करण्यात आला आहे, लवकरच याला कॅबिनेटच्या बैठकीत तांत्रिक मंजुरी मान्यता मिळेल, असा विश्वास खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केला आहे.
७११ किलोमीटरच्या मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबई, ठाणे, नवीमुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, माळशिरस, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विक्रमाबाद या मार्गे ही ट्रेन हैदराबाद येथे पोहचणार आहे. यामध्ये अकरा रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे. मुंबई ते हैदराबाद प्रवास केवळ तीन तासात पूर्ण होणार आहे.
या मार्गावर प्रति तास ३५० किलोमीटरच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे, तसा त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे, हा वेग सरासरी २५० किमी प्रति तास असेल. रूळ स्टॅंडर्ड गेजचे असणार असून एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे. आत्ता मुंबई- हैदराबाद प्रवास करण्यासाठी १४ तास लागतात. या बुलेट ट्रेन मुळे पैसा आणि वेळ लोकांचा वाचणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.