सातारा : आम्ही सातारा पालिकेत भ्रष्टाचार केला असा त्यांचा आरोप आहे तर त्यांनी समोरा समोर येऊन पुरावे द्यावेत. नाही तर त्यांनी पोवईनाक्यावर समोरसमोर यावे. तेथेही जमत नसेल तर अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉईंटवर या. आम्ही भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले तर माझा कडेलोट करा. नाही तर तुम्ही उडी मारा. पण, यात्रेत पिपाणी वाजविण्यासारखे करू नका, असा सणसणीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना लगावला आहे.
सातारा पालिकेच्या नुतन इमारतीच्या कामाची पहाणी केल्यानंतर उदयनराजेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या आरोपांना जशासतसे उत्तर दिले. खासदार उदयनराजे म्हणाले, साताऱ्याची हद्दवाढ आम्ही मार्गी लावली. हद्दवाढ झाली नसती तरी सध्याच्या पालिकेच्या इमारतीची दयनिय अवस्था होती. जनता व अधिकाऱ्यांत संवाद होत नव्हता.
आमच्या वचननाम्यात सातारकरांना दिलेली सर्व वचने पूर्ण केली आहेत. याचाच एक भाग म्हणून पालिकेची ही नवीन प्रशासकिय इमारत होत असून दीड लाख स्वेअर फुटाची नऊ मजली इमारत होणार आहे. समोरच जिल्हा परिषदेची पाच मजली असून पालिकेची नऊ मजली इमारत होत आहे. जेणे करून चांगल्या प्रकारे व्यवस्थापन चालून नागरीकांचे प्रश्न सोडविले जातील, हा हेतू ठेऊन आम्ही आमच्या वडीलांचे मित्र ज्येष्ठ बाबासाहेब कल्याणीची भेट घेतली.
त्यांनीही अत्यंत उदार अंतःकरणातून ऐन मोक्याची जागा पालिकेला विनामुल्य दिली. अनेकांनी वारंवार आमच्याविरोधात आवाज उठवत भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचार केला म्हणत आहेत. मुळात भ्रष्टाचाराचे स्पेलिंग ही मला माहिती नाही. तसे असते तर जे ज्येष्ठ विचारवंत आरोप करतात, त्यांना थोडी तरी जनाची नाही मनाची तरी त्यांना वाटली पाहिजे. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत.
ज्यावेळी यांच्याकडे संपूर्ण सत्तास्थाने होती, २० वर्षे निर्विवाद सत्ता होती, सगळी पदे होती. पालकमंत्री, नगरपालिकेसह सगळे असताना एकही काम झालं नाही. कारण त्यावेळीही पालिकेत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत होता. दुसरे काहीही कारण नाही. दूरदृष्टीचा अभाव, इच्छाशक्तीचा अभाव, आपल्याशिवाय पर्याय नाही हे जाणून या घराण्याचे वलयच इतकं मोठं आहे. त्यामुळे लोक त्यांच्यासोबत राहत होते.
काही नाही केलं तरी चालतंय, असा अर्थ ही काहीजण घेत होते. पण, आम्हाला चालत नाही. आम्ही सत्ता असो व नसो... नगरसेवकांपासून मी सुरवात केली. त्यावेळेपासून आम्ही तळमळीने काम करतोय. आम्ही अनेक आंदोलने केली, आमच्यावर केसेस झाल्या. पण आमच्याकडे सत्ता नसल्याने पर्याय नव्हता. नियोजन शून्य अक्कल शून्य असे नावे ठेवली गेली. गावाने ओवाळून टाकलेली उदयनराजे व त्यांची सगळी टीम आहे, असे आरोप झाले.
कासच्या कामासाठी व हद्दवाढीतील भागासाठी प्रत्येक वेळी दादांनी पैसे दिले दादांन पैसे दिले असे सांगत आहेत. कोण दादा.... असा प्रश्न उदयनराजे म्हणाले, तुमच्या जाहिरनाम्यात याचा उल्लेखही नव्हता. तुम्हाला श्रेय घ्यायचे असेल घ्या. चांगले झाले की श्रेय घ्यायचे आणि फोटो प्रसिद्ध करायचे, हेच त्यांचे काम आहे. श्रेय मला मिळेल म्हणून त्यावेळच्या लोकप्रतिनिधींना आम्ही सांगितले होते हे सगळं तुमच्यामुळे झालं. हद्दवाढीमुळे वाढीव भाग पालिका क्षेत्रात आला आहे. त्यांना मागेच पाणी मिळाले असते.
पण, तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी खर्चिक अशी शहापूर योजना आणली. त्याचे बिलच दीड कोटी रूपये येतं. या योजनेत जे जे अधिकारी सहभागी आहेत, त्यांच्याविरोधात शासनाकडे तक्रार करणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. त्यांना वाटते ना आम्ही सातारा पालिकेत भ्रष्टाचार केला तर त्यांनी समोरासमोर यावे आणि पुरावे द्यावेत. यासाठी आमचे त्यांना आव्हान आहे त्यांनी पोवईनाक्यावर समोरसमोर यावे. तेथे जमत नसेल तर अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉईंटवर या. आम्ही भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले तर माझा कडेलोट करा. नाही तर तुम्ही उडी मारा. यात्रेत पिपाणी वाजविण्यासारखे चाललं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.