राहुल गडकर
Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला. त्यासारखी व त्यावेळची वाघनखं महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत, पण ती वाघनखं महाराष्ट्रात येण्याआधीच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले आहेत का? असा सवाल करीत त्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय युद्ध पेटले आहे.
ही वाघनखं लंडनमध्ये आली कुठून? सध्या खरी वाघनखं आहेत तरी कुठं? मग लंडनमध्ये आहेत ती वाघनखं कोणती? अशा अनेक विषयांवरून इतिहास संशोधकांमध्ये मतमतांतरे आहेत. राज्य सरकार आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार कितीही दावा करत असले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली ही वाघनखं लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत असा कोणताही सबळ पुरावा आजपर्यंत कोणत्याच इतिहास संशोधकाला मिळालेला नाही. शिवाय भारतीय पुरातत्त्व विभागाकडेदेखील अशा कोणत्याच पद्धतीचा पुरावा उपलब्ध नाही. याचा माग काढण्यासाठी 'सरकारनामा'ने इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे आणि इतिहास अभ्यासक डॉ. इंद्रजीत सावंत यांच्याकडून सखोल माहिती घेतली.
इतिहास अभ्यासक सावंत सांगतात, ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत. हे ब्रिटननेसुद्धा लिहिलेलं आहे. "अफझलखानाच्या वधावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी या पद्धतीची वाघनखे वापरली होती, पण ती हीच वाघनखं आहेत का नाही? यावरून इतिहास संशोधकांमध्ये मत-मतांतरे आहेत," असा उल्लेख आढळत असल्याचे सावंत सांगतात.
'शोध भवानी तलवारीचा' हे पुस्तक लिहीत असताना डॉ. सावंत यांनी वाघनखं : एक अभ्यास यावर लेख प्रकाशित केला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, 1840 ते 1844 च्या सुमारास जेम्स कनिंगहॅम ग्रेट डफ हा मराठ्यांचा इतिहास लिहिणारा इंग्रज अधिकारी सातारा संस्थानचा रेसिडेट म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याची आणि छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. डफ इंग्लंडला परत जाताना प्रतापसिंह यांनी मैत्रीखातीर राजवाड्यातील अनेकांतील एक वाघनखं भेट स्वरूपात दिले. पुढे डफ याचा नातू अड्रीयन ग्रॅट डफने ही वाघनखं हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला भेट दिली, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. यावरून सिद्ध होते की, लंडनला असणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत, पण ती वाघनखं छत्रपती घराण्यातीलच आहेत,असे दिसून येते.
वाघनखं साताऱ्यांच्या बाहेर गेलीच नाहीत...
जर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नसतील, तर महाराजांची वापरलेली वाघनखं गेली कुठे? असा सवाल उपस्थित होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं ही महाराष्ट्राच्या बाहेर कधीच गेली नाहीत. शिवाय साताऱ्याच्या बाहेरही गेली नाहीत. महाराजांची वाघनखे ही साताऱ्यातील जलमंदिरातच आहेत. असे अनेक सबळ पुरावे 1919 पर्यंत उपलब्ध आहेत. त्या संदर्भात 'शोध भवानी तलवारीचा' या पुस्तकात वाघनखं : एक अभ्यास या लेखात इंद्रजीत सावंत लिहितात, ग्रॅट डफ आणि एल्फिन्स्टनना भेट दिलेली वाघनखं सोडून शिवाजी महाराजांची म्हणून ओळखली जाणारी आणखी दोन वाघनखं इ. स. १९१९ पर्यंततरी सातारकर छत्रपतींच्या राजवाड्यात पाहावयास मिळत होती. डफने त्याचा मार्गदर्शक माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचेच नाव आपल्या मुलाला ठेवले होते. इ.स. १८७४ मध्ये हा डफचा मुलगा भारत भेटीवर आला होता, त्यावेळी त्याने सातारा येथील राजवाड्याला भेट दिली होती. त्यावेळी या ठिकाणी दोन वाघनखंही पाहिली होती, त्याचे वर्णन त्याने आपल्या 'नोट्स ऑफ इंडियन जर्नीं' या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
शेवटचा सबळ पुरावा
ग्रँट डफला छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी वाघनखं भेट दिल्यानंतर जवळपास 40 ते 45 वर्षांनी म्हणजेच 1907 रोजी मॉर्डन रिव्ह्यू या मासिकेत साताऱ्यातील छत्रपती घराण्यातून एक फोटो प्रकाशित झाला होता. त्या फोटोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि दोन वाघनखे ठेवण्यात आली होती. असा फोटो प्रकाशित झाला होता. 1919 पर्यंत ही वाघनखं साताऱ्यातील जलमंदिरच्या भवानी मंदिरात असल्याच्या नोंदी आढळतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वाघनखं ही साताऱ्याच्या छत्रपती घराण्याकडेच आहेत, असे स्पष्ट होते.
निवडणुकीच्या तोंडावर डावपेच
या वाघनखांबाबत, इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांचेही मत जाणून घेतले. लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत. असा एकही सबळ पुरावा नाही. त्यामुळे ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जर सबळ पुरावा हातात असेल, तर ती वाघनखं केवळ तीन वर्षे नको तर कायमचीच महाराष्ट्रात आणावीत, पण निवडणुकीच्या तोंडावर हा डावपेचाचा एक प्रकार असू शकतो, असे मत स्पष्ट केले.
किती दिवस राजकारण करणार?
छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नावावर राज्यकर्ते अजून किती दिवस राजकारण करणार? असा सवाल जनतेमधून उपस्थित होत आहे. येणारी वाघनखं ही छत्रपती घराण्यातीलच आहेत. त्यातून शिवप्रेमींना समाधान ही मिळेल. पण त्यांच्या भावनेशी झालेला खेळ हा कोण भरून काढणार? असे अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.