
प्रमिला चोरगी
Solapur, 02 June : मंत्रिपदावर हक्क असतानाही डावलले गेल्यामुळे पाच वेळा निवडून आलेले विजयकुमार देशमुख आणि तीनदा विजय खेचून आणणारे सुभाष देशमुख नाराज होते. मात्र, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सचिन कल्याणशेट्टींना सर्वाधिकार त्यांना काँग्रेस नेत्यांसोबत आघाडीचे स्वतंत्र दिल्यानंतर दोन्ही देशमुखांच्या नाराजीचा भडका उडाला. सोलापूर भाजपमध्ये उघड उघड दोन गट पडले. नवे आणि जुने या संघर्षाला तोंड फुटले. दोन्ही देशमुखांनी वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. भाजप नेत्यांनाच सुभाष देशमुखांच्या घरी जावे लागले, पण त्यांची नाराजी कायम राहिली. आता दोन्ही देशमुखांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून त्यांना चर्चेसाठी मुंबईला पाचारण केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. पक्षाकडून पाच वेळा निवडून आलेले विजयकुमार देशमुख आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विजयश्री खेचून आणणारे सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांचा मंत्रिपदावर हक्क होता. मात्र, पक्षाकडून मागील पंचवार्षिकप्रमाणे सोलापूर राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे दोन्ही देशमुख नाराज होते. तसेच, निर्णय प्रक्रियेतही दोन्ही देशमुखांना डावलण्यात येत असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.
सोलापूर (Solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही देशमुखांच्या नाराजीचा भडका उडाला. कारण सचिन कल्याणशेट्टींना निवडणुकीचे अधिकार देण्यात आले होते. कल्याणशेट्टींना काँग्रेस नेत्यांशी आघाडी करून बाजार समितीत सत्ता मिळविली, त्यामुळे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख नाराज होते. पण त्यांच्या नाराजीची दखल घेतली जात नव्हती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशमुखांची नाराजी भाजपला (BJP) परवडणारी नाही, हे ओळखून खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरचा दौरा केला. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याकडे दोन्ही देशमुखांनी पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा आणखी वाढली.
महसूल मंत्री बानकुळे यांनी नियोजित दौऱ्यांमुळे दोन्ही देशमुख उपस्थित राहू शकले नाहीत, असे म्हटले होते. वास्तविक, सुभाष देशमुख हे सोलापुरातच होते. मात्र, त्यांनी बावनकुळेंच्या दौऱ्याकडे त्यांनी पाठ फिरवली हेाती. शेवटी जाता जाता बावनकुळेच सुभाष देशुखांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांच्यात चर्चा झाली. बावनकुळेंनंतर चंद्रकांत पाटीलही सोलापुरात आले होते. त्यांनीही सुभाषबापूंची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे दोन्ही देशमुखांची नाराजी कायम आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि वरिष्ठ नेते चंद्रकांतदादांच्या दौऱ्यानंतरही दोन्ही देशमुखांची नाराजी कायम होती. त्यातच कल्याणशेट्टी आणि कोठे या नवख्या आमदाराला पक्षश्रेष्ठींकडून झुकते माप मिळत असल्यानेही देशमुखांची नाराजी आहे. तसेच इतर पक्षांतून आलेल्या लेाकांना सन्मानाची वागणूक देताना जुन्या आणि निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना दोन्ही देशमुखांच्या मनात निर्माण झालेली असू शकते.
दरम्यान, दोन देशमुखांची नाराजी दूर करण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सूत्रे हाती घेतल्याची माहिती आहे. सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या दोघांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईला पाचारण केले आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशमुखांना वेगवेगळ्या दिवशी बोलावण्यात आले आहे. येत्या बुधवारी (ता. ०४ जून) आणि गुरुवारी (ता. ०५ जून) दोघांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावले आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तरी दोन्ही देशमुखांची नाराजी दूर होणार का, हा खरा सवाल आहे.
विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची आपापल्या मतदासंघावर घट्ट पकड आहे. मागील २०१७ च्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली होती. आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर दक्षिणमध्ये प्रथमच भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते. सोलापूर महापालिकेवर भाजपची पुन्हा सत्ता आणायची असेल तर दोन्ही देशमुखांकडे दुर्लक्ष करणे, हे महागात पडू शकते, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यात लक्ष घातले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.