
Sangli News : राज्यात सध्या जेष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. आता फक्त चर्चाच नाही तर याबाबत शरद पवार यांनी एकाआर्थी ग्रीन सिग्नल देताना याचा निर्णय खासदार सुप्रिया सुळेच घेतील असे सांगितले होते. त्यानंतर आज (ता.14) राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक लागली आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे चर्चांना वेग आला असतानाच मात्र सांगलीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात (Islampur) संभ्रमावस्था दिसत आहे.
विधानसभेला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुतीला सांगलीत कडवी झूंझ दिली. तर आपल्या मतदार संघात स्वत:चा विजयही खेचून आणला. यानंतर आता त्यांच्याच मतदारसंघात त्यांना शह देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) गट गेल्या काही महिन्यापासून राजकीय खेळ्या करत आहे. आतातर निशिकांत पाटलांच्या सोबतीला माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची साथ आहे. त्यातच सत्यजित देशमुख, सम्राट महाडीक आणि आमदार सदाभाऊ खोत यांचीही रसद मिळत आहे. आतातर सम्राट महाडीक यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद देवून भाजपने त्यांची ताकद आणखी वाढवली आहे. याचा वापर अजित पवार गट आगामी स्थानिकच्या निवडणुकीसाठी करण्याची रणनीती आखत आहे.
पण सध्या राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच येथील स्थानिक खेळ्यांना मात्र धक्का बसला आहे. जयंत पाटलांना टोकाचा विरोध करणाऱ्या निशिकांत पाटलांसह अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कोणती भूमिका घेतात हे ही आता पाहावं लागणार आहे. तर या चर्चांमुळे सध्या येथे संभ्रमावस्था दिसून येत आहे.
जयंत पाटील यांच्याविरोधात दंड थोपाटताना निशिकांत पाटील यांनी 2018 च्या इस्लामपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्षाची मागणी केली होती. पण ती न मिळाल्याने बंडखोरी केली होती. यानंतर निवडून येत ते नगराध्यक्ष झाले होते. त्यानंतर लगेच भाजप सोबत जात भाजप जिल्ह्याध्यक्षही झाले. यानंतर विधानसभेला जयंत पाटील यांच्याविरोधात 2019 आणि 2014 मध्ये निवडणूक लढवली. ज्यात त्यांना यश आले नाही. पण त्यांच्या नावाची जोरदार चर्चा जिल्ह्यासह राज्यात झाली. कारण जयंत पाटील यांना यावेळी फक्त 13000 चे मताधिक्य मिळाले. अशा पद्धतीने मोठा संघर्ष जयंत पाटील यांच्याविरोधीत करणाऱ्या निशिकांत पाटील यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुन्हा एकदा मोठा राजकीय निर्णय घ्यावा लागू शकतो. पण ते कोणता निर्णय घेतील हे फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावरच कळेल.
कधीकाळी राष्ट्रवादीत असणाऱ्या माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईकन यांच्यासाठीसुद्धा हा निर्णय धक्कादायक ठरू शकतो. कारण त्यांनी देखील राष्ट्रवादी सोडून भाजप आणि आता राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला आहे. तर हा प्रवेश त्यांनी फक्त आपल्या गटाच्या राजकीय भवितव्यासाठी केल्याची जिल्ह्यात चर्चा असून तेही कोणता निर्णय घेतात. त्यांची भूमिका काय असू शकते याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा राज्यात सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अनेकांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ होण्याकडे नवा डाव टाकला. त्यांनी याची सर्व सुत्रे आणि अधिकार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांना देवून टाकले.
एकीकडे एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना जयंत पाटील यांची भूमिका समोर आलेली नाही. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर असे झाल्यास ते पुन्हा सत्तेच्या लाटेवर स्वार होतील आणि मतदारसंघासह जिल्ह्यातील सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती येतील अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.