

जयसिंगपूर नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपला गड कायम राखला आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, भाजप, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात हालचाली सुरू आहेत.
Kolhapur News : नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जयसिंगपूर नगरपालिकांमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आपला गड राखला. मात्र संपूर्ण महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यड्रावकर याच्या विरोधात राहिले. तरी देखील आमदार यड्रावकर गटाने राजर्षी शाहू आघाडीचा झेंडा फडकवला. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एकटे फाडण्याचा डाव आखला जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याविरुद्ध काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व भाजप एकत्र येण्याची शक्यता असून तशा हालचाली राजकीय पातळीवर सुरू आहेत.
नुकत्याच भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक बैठकीत यड्रावकर यांच्या विरोधात एकास एक लढत देण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीप्रमाणे एकत्र येऊन लढण्याचा सूर आळविण्यात आला असून लवकरच या प्रक्रियेला मूर्त स्वरूप येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात यड्रावकर विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी यांच्यात राजकीय संघर्ष पहायला मिळणार असून त्याला विधानसभेची झालर असल्याने हा संघर्ष पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वच पातळीवर होणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही या संघर्षाची नांदी असणार आहे. शिरोळ तालुक्यातील राजकारणात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर
यांच्या विजयाचा वारू चौखूर उधळला असून प्रत्येक निवडणुकीत ते राजकीय विरोधक संपवत निघाले आहेत. सेवा सोसायटी, दूध संस्था, पतसंस्थांपासून ग्रामपंचायत, नगरपालिका शिवाय इतर सत्ताकेंद्रांत यड्रावकर गटाने चांगलेच पाय पसरले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जयसिंगपूर, कुरुंदवाड शहरात त्यांनी राजर्षी शाहू आघाडीचा झेंडा रोवला. आमदारकी, विकासकामासाठी मोठा निधी देण्याची ताकद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरदहस्त, गावागावांतील छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होणारे नेतृत्व व थेट संपर्काचे जाळे या बळावर आमदार यड्रावकर आपले राजकीय बळ वाढविताना दिसत आहेत.
विरोधी आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या गटात घेत त्यांनी विरोधकांना खिळखिळे करण्यात बऱ्यापैकी यश मिळविले असून महायुतीत असले तरी महायुतीमधील भाजपबरोबर त्यांचे संबंध कधीच मधुर राहिले नाहीत. काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील व स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांचा उभा राजकीय संघर्ष आहे. त्यात आता भाजपची भर पडली आहे. सर्व विरोधकांचे शहरापेक्षा गावपातळीवर मतांचे चांगले पॉकेट आहे.
त्यामुळे यड्रावकरांचे सर्व विरोधक आगामी काळात एकवटणार असल्याचे संकेत आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ३६ ग्रामपंचायती, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, मार्केट कमिटी निवडणुका होणार असून यातून ग्रामीण राजकारण ढवळून निघणार आहे. प्रत्येक नेत्यांची, गटाची ताकद दिसणार असून या निवडणुका तालुक्याची पुढील राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या आहेत.
त्यामुळे यड्रावकर यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला रोखण्यासाठी त्यांच्या विरोधकांची पावले एकत्र लढण्याकडे पडत आहेत. जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत यड्रावकर विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयोग केला. त्यांना निवडणुकीत यश मिळाले नसले तरी एकत्र येऊन लढण्यात ते यशस्वी झाले. 'जयसिंगपूर पॅटर्न' आता तालुक्यातील अन्य निवडणुकांतही दिसणार आहे.
रणनीती आखण्यावर एकमत... भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्याची जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक बैठक नुकतीच झाली असून त्यातही यड्रावकरांचा पाडाव करण्यासाठी पक्षाची मान्यता घेऊन यड्रावकर विरुद्ध सर्व एकत्र अशी रणनीती आखण्यावर एकमत झाल्याचे समजते. वरिष्ठ नेत्यांपर्यंत निरोप देण्याची जबाबदारी गुरुदत्त शुगर्सचे संस्थापक माधवराव घाटगे यांच्याकडे देण्यात आली आहे.
त्यामुळे आगामी काळात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर विरुद्ध गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माधवराव घाटगे असा राजकीय संघर्ष पहायला मिळणार असून पुढील विधानसभा म्हणजे साधारणपणे चार वर्षे हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी पहायला मिळेल. त्याची सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकीत सुरू होईल, असे चित्र आहे.
Q1. जयसिंगपूर नगरपालिकेत कोणाचा विजय झाला?
➡️ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाचा विजय झाला.
Q2. यड्रावकर कोणत्या आघाडीचे नेतृत्व करतात?
➡️ ते राजर्षी शाहू आघाडीचे नेतृत्व करतात.
Q3. आगामी कोणत्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत?
➡️ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हालचाली सुरू आहेत.
Q4. यड्रावकरांविरोधात कोणते पक्ष एकत्र येऊ शकतात?
➡️ काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना.
Q5. या घडामोडींचा परिणाम काय होऊ शकतो?
➡️ जिल्हा परिषद निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.