
Sangli News : देशात सर्वात जुन्या असणाऱ्या काँग्रेसला सध्या घर घर लागली आहे. देशात सध्या भाजपची सत्ता असून अनेक राज्यात काँग्रेसकडे सत्ता नाही. तर निवडणुकीवेळी कट्टर कार्यकर्त्यावर विश्वास न दाखवता काँग्रेसने नेत्यांचे ऐकून आयारामांना जवळ केले आहे. आज हेच आयाराम पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार काँग्रेसमधील शेवटचा कार्यकर्ता करताना दिसत आहे. आता अशीच तक्रार सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि काही मोजक्या नेत्यांनी थेट पक्ष निरीक्षक, माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्यासमोर केली आहे. तर काँग्रेस पक्षात लोकांची भूमिका, कार्यकर्त्यांची मते यापेक्षा नेत्यांच्या सोयीला अधिक महत्व दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक, माजी आमदार रामहरी रुपनवर सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेस कमिटी येथे जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. तर विविध दोन बैठकाही घेतल्या. यावेळी पहिल्या बैठकीत माजी आमदार विक्रम सावंत, तर दुसऱ्या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या स्वतंत्रपणे झालेल्या चर्चेत जिल्हा काँग्रेसने पुन्हा पक्ष मजबूत बांधण्याची ग्वाही दिली. मात्र तक्रारींचा पाढाच पक्ष निरीक्षक यांच्यासमोर वाचण्यात आल्याची चर्चा सध्या जोौरदार सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या सोयीस्कर भूमिका, बंडखोरीमुळे पक्षाचे नुकसान झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही हे कशावरून? असा सवाल यावेळी सामान्य कार्यकर्त्यांसह पृथ्वीराज पाटील यांनी केला. तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या अशा या सोयीस्कर भूमिकेमुळेच काँग्रेसचा खरा कार्यकर्ता खचला जातोय, याकडे लक्ष द्या, असे आवाहन रुपनवर यांना केले.
पृथ्वीराज पाटील यांनी, विधानसभा निवडणुकीतील भूमिकांवर पक्षाने काय कारवाई केली? असा सवालही केला. तर त्या बंडखोरांच्या समर्थकांवर कारवाईचा प्रस्ताव कुणाच्या दबावामुळे प्रलंबित ठेवण्यात आला असाही सवाल केल्याने काँग्रेसमधील वादाची आता जिल्ह्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
रुपनवर यांनी, जिल्ह्यासह शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून पक्षाच्या हिताचा विचार शेवटचा कार्यकर्ता करत असतो. त्याचा विचार पक्ष नक्की करेल. या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या जातील. योग्य भूमिका घेऊन पक्ष कसा वाढेल आणि कष्ट करणाऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन रुपनवर यांनी दिले आहे.
पृथ्वीराज पाटील यांनी, पक्ष संकटात असताना हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते घेऊन आम्ही लढलो. पण पक्षातील नेत्यांनी आमच्यावर त्यांचे नेतृत्व लादले. पक्षाचा घात मक्तेदारी समजणाऱ्यांनी केला. आता ही प्रवृत्ती थांबायला हवी, ही प्रवृत्ती थांबली नाही तर आम्ही पक्षात का थांबावे असाही सवाल त्यांनी केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना पाठीशी घालण्याची पक्षाची भूमिका योग्य नसल्याचेही पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं आहे.
आगामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत. पण जो कार्यकर्ता पहिल्यापासून पक्षासाठी राबला आहे किंवा ज्याची शिफारस कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यालाच संधी देण्यात यावी. नाहीतर शिफारस एकाची आणि नियुक्ती दुसऱ्याची करून आमच्यावर नेतृत्व लादू नये अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.