
फलटण शहर : फलटण शहरातील न झालेल्या रस्त्यांची बिले काढण्याचा प्रताप फलटण पालिकेत झाले आहेत. रस्त्यांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून ठराविक ठेकेदाराचे हीत जोपासण्याचे काम राजे गटाकडून सुरु आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबत तक्रारी केल्यास धमक्या दिल्या जातात. विद्यमान मुख्याधिकारी हे निष्क्रिय असुन ते टक्केवारीत गुंतले आहेत, असा आरोप माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या फलटण येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे व पक्षाचे अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. फलटण नगरपरिषद भ्रष्टाचाराचे मोठे कुरण बनली आहे. या भ्रष्टाचाराचे आम्ही पुराव्यानिशी पोलखोल करीत आहोत. वर्क ऑर्डर नसताना सहा रस्त्यांची कामे करुन त्यांची बिलेही अदा केली आहेत.
या भ्रष्टाचारास सत्ताधाऱ्यांचा कृपाशिर्वाद कारणीभूत आहे असे स्पष्ट करुन शहा म्हणाले, विद्यमान मुख्याधिकारी हे निष्क्रिय असून टक्केवारीमध्ये ते गुंतलेले आहेत. ठेकेदारांचे व राजे गटाचे हित जोपासण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे, याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार त्यांच्या व नगरपालिकेच्या विरोधात लवकरच न्यायालयात किंवा राज्य सरकारकडे पुराव्यानिशी तक्रार करणार आहोत.
सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. तालुक्यातील एकाधिकारशाहीही संपुष्टात येईल. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सक्षम पर्याय जनतेला मिळाला आहे, याचे भान समस्त अधिकाऱ्यांनी ठेवावे. कोणाच्याही दबावाखाली खोटी बिले काढून भ्रष्टाचारास पाठबळ देवू नका, कामे दर्जेदार करा. अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही अनुप शहा यांनी दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.