
Solapur, 30 November : संपूर्ण राज्यभरात विरोधी पक्षाने ईव्हीएमच्या विरोधात रान उठवले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर तब्बल ७५ लाख मतदान वाढल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सोलापूर जिल्ह्यातही विरोधकांकडून ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करत सत्ताधारी उमेदवारांना मिळालेली मते यावर आक्षेप घेण्यात येत आहे.
माळशिरस ( Malshiras) तालुक्यातील मारकवाडी गावाने भाजपचे राम सातपुते यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर विधानसभेप्रमाणे मतदान घेण्याची तयारी दाखवली आहे. त्या संपूर्ण प्रक्रियेचा खर्च करण्याची तयारीही गावाने दाखवले आहे, त्यामुळे प्रशासन बॅलेट पेपरवर पुन्हा विधानसभा प्रक्रियेप्रमाणे मतदान घेण्याची परवानगी देणार का, हा खरा प्रश्न आहे.
महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत ईव्हीएमच्या (EVM) विरोधात विविध मार्गाने आवाज उठवला आहे. महाविकास आघाडीच्या राज्यभरातील अनेक उमेदवारांनी पैसे भरून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. अनेक जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार, माजी आमदार नरसय्या आडम यांनी तर मतदासंघातील विधानसभेची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांकडून रान उठवले जात आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकवाडी गावात एकूण 2300 मतदानापैकी 1905 मतदान झाले आहे. मतमोजणीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले आहे. मात्र, ग्रामस्थांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते (सुमारे 1000) यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेतला आहे. जानकर यांना मानणाऱ्या या गावात सातपुते यांना मताधिक्क मिळणं अशक्य असल्याचे म्हटले आहे. त्यावरून गावकऱ्यांनी फेरमतदानाची मागणी केली आहे.
मारकवाडी गावाने विधानसभा निवडणुकीप्रमाणे बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्यावे. त्यासाठी येणार संपूर्ण खर्च करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली. माळशिरसच्या तहसीलदारांकडे गावकऱ्यांनी खर्चाची रक्कम भरून फेर मतदानाची प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे. आता प्रशासन त्यांना फेरमतदान घेण्यासाठी परवानगी देणार का, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.