Deepak Dalvi : सीमाप्रश्न जिवंत ठेवणारा वाघ हरपला : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन

Deepak Dalvi : सीमावादाचे ज्येष्ठ नेते आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी (८४) यांचे निधन झाले.
Veteran MES leader Deepak Dalvi, who spearheaded the Maharashtra-Karnataka border struggle for over seven decades, breathed his last today.
Veteran MES leader Deepak Dalvi, who spearheaded the Maharashtra-Karnataka border struggle for over seven decades, breathed his last today.Sarkarnama
Published on
Updated on

Deepak Dalavi : तब्बल ७० वर्षांपासून धगधगणाऱ्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यातील ज्येष्ठ नेते, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे आज (मंगळवार, १७ मार्च) वृद्धापकाळाने निधन झाले. ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ७.३० वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दीपक दळवी मागील अनेक वर्षांपासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात सामील व्हावीत, या मागणीसाठी हा संघर्ष होता. कर्नाटक सरकारकडून सीमाभागात होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. दिवंगत नेते एन.डी. पाटील यांचीही दळवी यांना खंबीर साथ लाभली.

डिसेंबर २०२१ मध्ये बेळगाव येथे त्यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. दळवी यांना अनेकदा बेळगाव पोलिसांनी अटकही केली होती. १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समिती 'काळा दिवस' पाळते. या आंदोलनांचे नेतृत्व अनेक वर्षे दीपक दळवी यांनी केले आहे.

याशिवाय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, मराठा को-ऑप. बँकेचे माजी चेअरमन आणि ‘दि ओरिएंटल इंग्लिश अकादमी’चे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. काही वर्षांपूर्वी ओरिएंटल इंग्लिश अकादमीच्या मैदानावर तोल जाऊन पडल्याने त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्यानंतर ते दीर्घकाळ आजारी होते. वैद्यकीय उपचार झाले, प्रयत्न झाले; मात्र प्रकृती पूर्ववत झाली नाही आणि अखेर या आजारपणातच त्यांची प्राणज्योत मालवली. 

दळवी कुटुंबाची सीमालढ्यातील एन्ट्री :

दळवी कुटुंबाचा सीमालढ्याशी असलेला संबंध हा केवळ योगायोग नव्हता, तर तो एक परंपरेचा वारसा होता. टिळकवाडी येथील त्यांचे घर आणि फर्निचर कारखाना हे कार्यकर्त्यांचे अड्डेच बनले होते. काका गोविंदराव हे सीमालढ्याचे अग्रणी नेते, तर गोपाळराव सत्याग्रही म्हणून ओळखले जात. वडील अर्जुनराव हे यशस्वी व्यावसायिक असून चळवळीचे पाठीराखे होते. या साऱ्या वातावरणात दीपक दळवी घडले.

शिक्षणासाठी सांगली येथे गेलेले दळवी उच्च शिक्षण पूर्ण करून १९८० मध्ये बेळगावात परतले आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सीमालढ्यात उतरले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९८५ मध्ये त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. कर्नाटक विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीत उमेदवारीच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी मोठेपणा दाखवत माघार घेतली; पण ही माघार पराभवाची नव्हे, तर संघर्षाची सुरुवात होती.

Veteran MES leader Deepak Dalvi, who spearheaded the Maharashtra-Karnataka border struggle for over seven decades, breathed his last today.
Karad BJP : यशवंतरावांच्या भूमीत ऐतिहासिक सत्तांतर घडविणाऱ्या भाजपपुढे ‘हे’ ठरणार मोठे चॅलेंज!

दळवी यांनी बेळगाव ते मुंबई असा ऐतिहासिक पदमोर्चा आयोजित केला. १५ एप्रिल १९८५ रोजी सुरू झालेला हा मोर्चा १ मे रोजी मुंबईत पोहोचला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मोर्चाचे स्वागत केले. मुंबईतील जाहीर सभेने या आंदोलनाला नवे बळ दिले. या पदमोर्चामुळे सीमाभागात नवचैतन्य निर्माण झाले आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी झाला.

१९८६ मध्ये कन्नड सक्तीविरोधी आंदोलन उसळले तेव्हा दळवी अग्रभागी होते. बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला. त्यांच्या अटकेनंतर आंदोलन अधिकच पेटले. या संवेदनशील काळात दळवी यांनी संयम, धैर्य आणि दूरदृष्टी दाखवत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवले. आंदोलनाचे नियोजन, समन्वय आणि नेतृत्व यात ते कुठेही कमी पडले नाहीत.

दळवी यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही निवडणुकीतील अपयशाला मनावर घेतले नाही. राजकीय क्षेत्रात यश मिळाले नाही, तरी त्यांनी चळवळ सोडली नाही. उलट अधिक जोमाने ते कार्यरत राहिले. त्यांच्यासाठी सत्ता नव्हे, तर प्रश्न महत्त्वाचा होता. २००० मध्ये बेळगावात झालेल्या ‘७३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. २००२ मध्ये त्यांनी बेळगाव-नागपूर मोटरसायकल मोर्चा काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. या मोर्चाचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते; मात्र कोल्हापूरजवळ मोर्चा अडविण्यात आला आणि सर्वांना अटक झाली. तरीही दळवी यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व सत्याग्रहींची सुटका करून घेतली.

Veteran MES leader Deepak Dalvi, who spearheaded the Maharashtra-Karnataka border struggle for over seven decades, breathed his last today.
Kolhapur ZP Inside Story: शेवटपर्यंत कोरे तटून राहिले,अखेर CM फडणवीसांनाच कोल्हापूर 'झेडपी'च्या अध्यक्षपदासाठी मध्यरात्री फोन फिरवावा लागला

२००६ मध्ये कर्नाटक सरकारने बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी महामेळाव्याचे आयोजन केले. या काळात त्यांच्यावर हल्ला झाला, चेहऱ्यावर काळा रंग फासण्यात आला; पण त्यांनी माघार घेतली नाही. उलट या घटनेनंतर मराठी समाज अधिक एकत्र आला. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्याच्या प्रक्रियेतही दळवी अग्रभागी होते. बेळगाव, मुंबई आणि दिल्ली अशा असंख्य फेऱ्या त्यांनी मारल्या. या कामासाठी त्यांनी स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले आणि आर्थिक नुकसानही सोसले.

कर्नाटक सरकारने त्यांच्यावर अनेक खटले दाखल केले, अटक केली; मात्र ते कधीही डगमगले नाहीत. दीपक दळवी यांचे आयुष्य हे संघर्ष, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक होते. त्यांनी सीमालढा केवळ जिवंत ठेवला नाही, तर तो अधिक धारदार केला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे; मात्र त्यांनी पेटवलेली ज्योत विझू न देणे, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com