Satara : काही दिवसांपू्र्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींनी लस तयार केली असं म्हटलं होतं. या त्यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी याच वक्तव्याचा समाचार घेताना फडणवीसांसह मोदींवर सडकून टीका केली होती. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी होय मोदींनीच लस तयार केला असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त केलं. फडणवीस म्हणाले, मोदींनी या देशामध्ये कोरोनोची लस तयार केली. मी परवा म्हटलं, तर उद्धवजींना ते फार झोंबलं, ते म्हणाले, लस मोदी तयार करतात का?. मग उद्धवजी रोज सांगायचे मी राज्य चालवतो. ते काय घोडा हाकत होते की बैलबंडी हाकत होते का? असा सवाल विचारत जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाकरेंवर पलटवार...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तर म्हणेन; होय, नरेंद्र मोदीं (Narendra Modi) लस तयार केली. त्याचं कारण असं आहे की, जगात पाच देश कोरोनावर लस तयार करु शकले. कारण मोदींच्या संबंधामुळे आपल्याला रॉ मटेरियल मिळालं मोदी यांनीच लस तयार केली. कारण जे शास्त्रज्ञ लस तयार करत होते. मोदीजी त्यांच्याकडे गेले. त्यांना मोदींनी १८०० कोटी रुपये दिले. कोरोनाची लस(Corona Vaccine) तयार झाली. त्यानंतर भारतातील १४० कोटी लोकांना मोदी यांनी मोफत लस देण्याचे काम केले. महाराष्ट्रात साडेसतरा कोटी मोफत लसी मोदी यांनी दिल्या. म्हणूनच मी म्हणेन की, मोदींनीच लस तयार केली.
आपल्या देशात प्रेतांचा खच पडला असता....
कोरोनाची लस मोदींनी दिली नसती तर आपण इथं बसू शकलो असतो का. काय अवस्था झाली असती आम्ही अमेरिका आणि रशियापुढे कटोरा घेऊन उभे असतो. आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या...असं म्हटलो असतो. त्यांनी सांगितलं असतं. थांबा, आधी आमच्या लोकांना देतो. परिणाम असे झाले असते की, आपल्या देशात प्रेतांचा खच पडला असता. आम्हाला इथं बसता आलं नसतं. पण या देशाला दूरदर्शी पंतप्रधान मिळाले. त्यांनी हिंमतीने कोरोनाचा सामना केला असंही फडणवीस म्हणाले.
'' पंढरपुरात या; पण...''
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे संपूर्ण मंत्रिमंडळ घेवुन पंढरपुरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यापार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात कोणीही येऊ शकतं. तेथे भक्तीभावाने या, पण राजकारणासाठी कोणी येऊ नये. त्या भावनेने तेथे कोणीही येत असेल तर त्यांचे तेथे स्वागतच आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री राव यांना लगावला.
ठाकरे काय म्हणाले होते..?
उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात कोरोना लसीच्या निर्मितीच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली होती. ठाकरे म्हणाले, “ देवेंद्र फडणवीस म्हणतायत, आज आपण सगळे एकत्रित याठिकाणी बसू शकलो, कारण कोविडची लस मोदींनी तयार केली. त्यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसलाय, हेच कळत नाही.
मोदींनी कोविडची लस तयार केली असेल, तर मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते का? संशोधक गवत उपटत होते का? हे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू पाहिल्यानंतर त्यांना खरोखर कोणती लस द्यायला पाहिजे, ते ठरवावं लागेल. त्यांना लस देण्याची गरज आहे असा टोलाही ठाकरेंनी लगावला होता.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.