भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( शरदचंद्र पवार ) प्रवेशावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे विधानसभेला मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे यांच्यात 'टफ फाइट' होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून घाटगे आणि खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांनी मिळून महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेतलं आहे. मात्र, आता महाडिक यांना घाटगे यांच्याविरोधात प्रचार करावा लागू शकतो.
त्यामुळे कालपर्यंत तुमच्यासोबत असलेले घाटगे यांच्याविरोधात कागलमध्ये जाऊन भाषण करताना तुमची कोंडी होणार नाही का? असा प्रश्न धनंजय महाडिक यांना करण्यात आला. त्यावर महाडिक आता कोंडी करून घेणार नाहीत, असं उत्तर धनंजय महाडिक यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
धनंजय महाडिक म्हणाले, "महाडिक आता कोंडी करून घेणार नाहीत. आम्ही भाजपचे पदाधिकारी आणि कार्येकर्ते आहोत. त्यामुळे पक्ष देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केले जाईल."
कागलमधील बदलत्या राजकीय परिस्थितीवरही महाडिक यांनी भाष्य केलं आहे. "कागल विधानसभा मतदारसंघात घाटके ( samarjitsinh ghatge ) काम करत आहेत. जेव्हा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत सत्तेत सहभागी झाली, तेव्हाच हसन मुश्रीफ हे उमेदवार निश्चित झाले. त्यामुळे घाटगे यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी वेगळी भूमिका घेतली."
कागलमध्ये 'स्वराज्य' निर्मितीसाठी 'तुतारी'
"छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले होते. आता कागलमध्ये पुन्हा स्वराज मिळवायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी. कागलच्या विकासासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरूया," असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी केले.
"आठ वर्षे भाजपात प्रामाणिक काम"
घाटगे म्हणाले, "कागल ही राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. दिवंगत विक्रमसिंह घाटगेंनी सहकाराचे जाळे निर्माण केले. विरोधकांनी शाहू महाराज कागलला जन्माला आले असे म्हटलेले नाही. त्यामुळे देशात शाहू महाराजांची जन्मभूमी सिद्ध करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करणार आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ नये म्हणून विरोधकांनी अडचणी निर्माण केल्या. आठ वर्षे भाजपात प्रामाणिक काम केले."
"सरकारची सर्व ताकद आपल्याविरोधात केवळ दोन महिन्यांपर्यंत"
"कागल विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळायला हवी होती, मात्र मिळाली नाही. या निवडणुकीत लढायचे की नाही?, अपक्ष लढायचे की आत्ताच तुतारी हाती घ्यायची? असे अनेक प्रश्न होते. मात्र, आमच्या मातोश्रींनी तुतारी घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. कुणाच्या रागापोटी, द्वेषापोटी तुतारी घेतलेली नाही तर कागलच्या विकासासाठी घेतली आहे. घाटगे म्हणाले, कागलमध्ये पुन्हा स्वराज्य मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी किंमत मोजण्याची तयारी ठेवावी. स्वराज्य निर्माण करण्यासाठी मी तयार आहे. कार्यकर्त्यांना काही अडचण आली तर मी संघर्षाला तयार आहे. सरकारची सर्व ताकद आपल्याविरोधात असली तरी ती केवळ दोन महिन्यांपर्यंत. नंतर राहणार नाही. पुढील 25 वर्षे आपली आहेत," असंही समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.