
Kolhapur Political News : राजकारणामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले कोल्हापुरातील बंटी विरुद्ध मुन्ना राज्यात सर्वश्रुत आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्यात विळा-भोपळ्याचे वैर आहे. एकेकाळी जीवलग असलेले सतेज पाटील (बंटी) आणि खासदार धनंजय महाडिक (मुन्ना) हे आता एकमेकांची राजकीय प्रतिष्ठा संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोल्हापूरकरांसाठी मंगळवारी काही नवलच घडले. खासदार मुन्ना महाडिकांनी बंटी पाटलांचे पहिल्यांदाच जाहीरपणे कौतुक केले. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या विषयावरच दिवसभर चर्चा रंगली आहे. (Latest Political News)
पारंपरिक राजकीय वैमानस्यातून एकमेकांवर शाब्दिक टीका करणाऱ्या आमदार सतेज पाटील आणि खासदार महाडिक या दोन्ही नेत्यांनी सध्या सामंजस्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर महानगरपालिकेला एसी बस दाखल झाल्या आहेत. यावर मंगळवारी खासदार धनंजय महाडिकांना (Dhanajay Mahadik) छेडण्यात आले. यावर त्यांनी लोकांसाठी केलेल्या या कामाचे आपण स्वागतच करतो, म्हणत सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. आपणही कोल्हापूरसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच शंभर इलेक्ट्रिक बस कोल्हापुरात आणणार असल्याचे महाडिकांनी सांगितले आहे.
लवकरच पूर्ण होणाऱ्या थेट पाइपलाइन योजनेबद्दलही महाडिकांनी पाटलांचे अभिनंदन केले. 'जे चांगले काम होईल, त्याचे कौतुक होणार आहे. उद्या थेट पाइपलाइन पूर्ण झाली तरी आम्ही त्यांची कौतुक करू, त्यांचे अभिनंदन करू. भविष्यातही विकासकामे करताना मी कामाचे श्रेय कधीच घेत नाही. दुसऱ्यानेही तसेच करावे, चांगल्या कामाची कौतुक करावे,' असाही चिमटा महाडिकांनी काढला. (Maharashtra Political News)
'राजाराम'बाबत विरोधकांना इशारा
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक सभा २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावर बोलताना 'कारखान्याचा विस्तार होत आहे, त्याला विरोध करण्याचे कारण काय? पूर्वी विस्तार होत नव्हता म्हणून टीका करत होतात. आता विस्तार करण्यास सुरुवात केल्यानंतरही टीका होत आहे. सभेत कारखान्यात कार्यक्षेत्र वाढवण्याबाबत ठराव होणारच आहे. त्याला विरोध करू नये,' असा इशारा खासदार महाडिकांनी विरोधकांना दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.