Sangali BJP News : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांमध्ये सुरु असलेले मतभेद संपले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष देईल 'त्या' उमेदवाराच्या पाठिशी राहणार आहे. भाजपच्या त्या उमेदवारास विक्रमी मतांनी निवडून आणू, असा ठराव भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत भाजप नेत्यांनी एकीचे दर्शन घडविताना वादावर पडदा पडल्याचे दिसून आले.
भाजपची जिल्हा ग्रामीण व शहर जिल्हा कोअर कमिटीची बैठक झाली. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप, लोकसभा क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा उमेदवारी व निवडणुकीसंदर्भात स्पष्ट बोलू शकता, आपली मते मांडू शकता, असे प्रशांत परिचारक यांनी बैठकीत म्हटले. त्यावर माजी आमदार जगताप म्हणाले, पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांनी प्रत्येकाची मते घेतली आहेत. त्यांचा अहवालही प्रदेश व केंद्रीय भाजपला सादर झाला आहे. त्यामुळे उमेदवारीवर आता बोलणे योग्य ठरणार नाही. पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी सर्वांनी एकसंघपणे राहणे व गेल्या निवडणुकीपेक्षा जादा मतांनी निवडून आणू.
दरम्यान, जगताप यांच्या मताशी सर्वांचे एकमत आहे का, असे परिचारक यांनी विचारले. त्यावर सर्वांनी एकमत असल्याचे सांगितले. भाजप जो उमेदवार देईल त्याच्या पाठिशी एकसंघ राहू व उच्चांकी मतांनी निवडून आणू, असा ठराव करण्यात आला. कोअर कमिटीची बैठक अवघ्या पंधरा- वीस मिनिटात संपली. बैठकीनंतर सर्व नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, कोअर कमिटी बैठकीत पक्ष, संघटनेच्या कामाचा आढावा झाला. भाजप जो उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी एकसंघपणे राहण्याचा व उच्चांकी मतांनी निवडून आंगण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या योजना, घेतलेले कल्याणकारी निर्णय लोकापर्यंत पोहोचवून निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. सांगली लोकसभेसाठी उमेदवारीची घोषणा वरिष्ठस्तरावरून लवकरच होईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मतभेदाचा विषय संपला : जगताप
भाजप नेत्यांमधील मतभेदासंदर्भातील प्रश्नावर माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठिशी एकसंघ राहण्याचा ठराव कोअर कमिटी बैठकीत एकमताने झाला आहे. त्यामुळे मतभेदाचा प्रश्नच येत नाही. मतभेदाचा विषय शंभर टक्के संपला आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.