Solapur BJP-Shivsena Dispute : कल्याणमधील शिवसेना-भाजपमधील वाद सोलापूरपर्यंत येऊन पोचला आहे. सोलापूर जिल्ह्यातही आम्ही भाजपचा खूप अन्याय सहन करतोय. पण आम्ही ज्यांचा विरोध पत्करून माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आणला. त्यांनाच बरोबर घेऊन ताकद दिली जात आहे. त्या लोकांना बरोबर घेऊन फिरणार असाल तर आमच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका, अशा शब्दांत शिवसेनेचा माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी भाजपला सुनावले. (Even BJP people should not expect our help : Sanjay Kokate)
कल्याणमधील एका पोलिस निरीक्षकाच्या बदलीवरून शिवसेना (Shivsena)-भाजपमध्ये (BJP) वाद पेटला आहे. जोपर्यंत त्या पीआयची बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव कल्याण भाजपने केला आहे. त्याला खासदार श्रीकांत शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या वादाचे लोण आता सोलापूर (Solapur) जिल्ह्यात पोचले आहे.
संजय कोकाटे म्हणाले की, कल्याणमधील भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहकार्य न करण्याचा ठराव केलेला आहे. त्याचा मी शिवसेनेचा माढा लोकसभा संपर्कप्रमुख मी निषेध करतो. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण सत्तेत आहोत, हे भाजपच्या शीर्ष नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातसुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाचा खूप अन्याय सहन करतो. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नाहीत. संजय गांधी निराधार योजनांच्या कमिट्यासुद्धा झालेल्या नाहीत. आमची कोणतीही कामे होत नाही. फक्त भारतीय जनता पक्षाचे काम करा, असा अलिखित आदेश प्रशासनाला दिलेला आहे, तेही आम्ही सहन करतो.
माढा लोकसभा मतदारसंघात विजयासाठी जिवाचं रान करून गेली २५ ते ३० वर्षे आमच्यावर झालेला अन्याय डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीत कष्ट करून भाजपचा खासदार निवडून आणला. पण, भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे आम्ही ज्यांचा विरोध पत्करून काम केले, त्यांनाच बरोबर घेतले जातंय, त्यांना ताकद दिली जात आहे, असा आरोपही कोकाटे यांनी केला.
ते म्हणाले की, उद्या कदाचित भाजपमधील अंतर्गत बंडाळी मिटेल. पण, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतील, असं मला वाटत नाही. आम्हाला काहीही अपेक्षा नाही. आमचं कुठलंही कामं झालेलं नाही. साध्या पत्रासाठी दहा दहा वेळा फोन करावा लागतो. त्याबाबतही आमची तक्रार नाही. पण ज्यांच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं. त्याच लोकांना तुम्ही बरोबर घेऊन फिरणार असाल तर भविष्यात तुम्ही आमच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका.
भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे. आपण सगळे सर्व्हे बघितलेले आहेत. एकनाथ शिंदे आपल्याबरोबर नसतील तर काय होईल, याचा विचार करा आणि आपल्या वर्तनात सुधारणा करा. आम्ही तुमच्यासोबतच आहोत, आम्हाला समजावून घ्या. आमचीही चार कामं करा. आपल्यात बदल होईल आणि आपली हवेतील उड्डाणं बंद कराल, आपण एकटेच सत्तेत आहोत, हे तुम्ही विसराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असा टोमणाही शिवसेना नेते कोकाटे यांनी मारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.