अहमदनगर - दैनिक सकाळच्या अहमदनगर आवृत्तीचा वर्धापन दिन कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमानिमित्त कोपरगावचे आमदार तथा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांनी सकाळच्या अहमदनगर कार्यालयाला काल ( शुक्रवारी ) भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांचे स्वागत आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील यांनी केले. त्यांनी सकाळ टीमशी संवाद साधला. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघात होत असलेल्या सुधारणांविषयी सांगताना महाविकास आघाडीची भूमिकाही स्पष्ट केली. ( Even if the responsibility of Ahmednagar is given to Fadnavis, Mahavikas Aghadi does not care )
आमदार आशुतोष काळे म्हणाले, भाजपचे नेते कायम वादाच्या विषयावर बोलतात. आम्ही मात्र विकासावर लक्ष केंद्रित करतो. लोकांचे प्रश्न मार्गी लागणे महत्त्वाचे असते. निष्कारण वादग्रस्त विधान करून त्यात वेळ घालण्यात अर्थ नाही. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नगरची जबाबदारी आली, तरी महाविकास आघाडीतील नेत्यांना विशेष फरक पडणार नाही. त्याबाबत दुर्लक्ष करून आम्ही विकासकामे करण्यात व्यग्र राहणार आहोत. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये तरुण आमदार जास्त आहेत. पक्षाचे मंत्री अनुभवी आहेत. त्याचा फायदा कामे लवकर होण्यासाठी होतो. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आमच्यामागे ताकदीने उभे राहतो. अडचणीच्या काळात नेते मदत करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साईसंस्थानातील प्रश्न सोडवू
शिर्डीतील साईबाबा संस्थानवर अध्यक्षपदी संधी मिळाली. संस्थानचे काही प्रकल्प नियोजित आहेत. ते पूर्ण करणार आहोत. बाबांनी दिलेली शिकवण अन्नदान प्रकल्पात अधिक सुधारणा करणार आहोत. शिर्डीतील सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. दर्शनरांगेबाबतही अधिक सुधारणा करण्याचे नियोजन आहे. शिर्डीतील व्यवसाय, कायदा, सुव्यवस्थेसाठी संस्थान कायम प्रयत्न करीत आहे, असेही आमदार काळे यांनी सांगितले.
कोपरगावच्या विकासात पाणीप्रश्नाला प्राधान्य
कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. 131 कोटी आणले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका फोनमध्ये हा प्रश्न मार्गी लावला. पाच क्रमांकाच्या तलावाचा प्रश्न मार्गी लागत आहे. कोपरगावच्या विकासात पाणीप्रश्न, रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य देत आहोत, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी 2020 मध्ये मंत्री जयंत पाटील यांनी एका बैठकीत शंभर कोटी मंजूर केले. त्यांपैकी 36 कोटी वर्ग झाले. 50 कोटींच्या कामाचे टेंडर होत आहे. अजूनही 83 कोटींची कामे प्रस्तावित आहेत. कालव्यांचे नूतनीकरण करणे, क्षमता वाढविणे, ही कामे प्राधान्याने होणार आहेत. वैतरणेचे पाणी मुकणे धरणात वळविणे महत्त्वाचे आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार कोपरगाववर अन्याय होतो, अशी भावना आहे. त्यात काही सवलत मिळाली, तर कोपरगावला फायदा होऊ शकेल, असेही काळे यांनी सांगितले.
कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. त्यात काही जमिनी गेल्या. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही मिळाली. या रस्त्याबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मतदारसंघातील रस्त्यांवर विशेष काम करीत आहोत. आवश्यक तेथे मोठे पूल होण्याची गरज आहे. त्यासाठी आगामी काळात नियोजन करून दळणवळण अधिक सुलभ करण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वप्नातील कोपरगाव
आगामी काळात कोपरगाव मतदारसंघाचा विकासासाठी विशेष नियोजन करीत आहोत. पाण्याचा प्रश्न, युवकांना रोजगार, निळवंड्याचे पाणी, चांगले रस्ते, नद्यांवरील मोठे पूल, व्यापारवृद्धी, बाजार समितीत अधिक सुधारणा, डाळिंब मार्केट अशा विविध विषयांवर आम्ही काम करीत आहोत. लवकरच माझ्या स्वप्नातील कोपरगाव अधिक विकसित व सुंदर असेल, असे आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.