

Solapur, 16 January : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या त्सुनामीत महाविकास आघाडीसोबतच राज्याच्या सत्तेतील मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती धूळदाण उडाली आहे. भाजपच्या विजयी लाटेत सोलापुरात पाच माजी महापौर, दोन माजी उपमहापौर यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. या शिवाय अनेक मातब्बरांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांचा निकाल आज जाहीर झाली. सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात पहिल्या फेरीपासूनच भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली होती. मतमोजणी जसजशी पुढे सरकत होती, तसतशी भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्याही वाढत होती. पण विरोधकांचे पुरते पानीपत होत होते.
महापालिकेच्या १०२ जागांपैकी भाजपने ८७ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. एमआयएम पक्षाने ०८ जागा जिंकून दुसरे स्थान पटकाविले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चार जागांवर यश मिळाले, तर काँग्रेसला दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
भाजपच्या या विजयी लाटेत सोलापुरातील अनेक मातब्बरांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यात पाच माजी महापौर, दोन माजी उपमहापौर, तसेच सभागृह नेता यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीने अनेकांना घरी बसविण्याचे काम केले आहे.
माजी महापौरांमध्ये काँग्रेसकडून लढलेले संजय हेमगड्डी, आरिफ शेख, समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले यू एन. बेरिया, शिवसेनेच्या अलका राठोड, अपक्ष मनोहर सपाटे यांचा पराभूतांमध्ये समावेश आहे. दिलीप कोल्हे आणि पद्माकर काळे या माजी उपमहापौरांनाही पराभूत व्हावे लागले आहे. या शिवाय तीन वेळा निवडून आलेले आनंद चंदनशिवे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, शिवलिंग कांबळे (शिवा बाटलीवाला) हेही पराभूत झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.