

Solapur, 16 August : करमाळा तालुक्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. दत्तकला शिक्षण संस्थेचे डॉ. रामदास झोळ यांचे भोंदू मनोहरमामा भोसले याच्याशी आर्थिक संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच, तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीचा मुद्दा तापलेला असतानाच तालुक्याची दुसरी अर्थवाहिनी असलेल्या मकाई साखर कारखान्यातील मशिनरी भंगारात विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णे यांनी केला आहे, त्यामुळे करमाळ्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मकाई कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांनी मशीनरी भंगारात विक्री केल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. कारखान्यातील किरकोळ भंगार विक्री केली आहे. कारखान्याची मशिनरी विक्री करण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा केला आहे.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जीनदायिनी म्हणून ओळख असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचा विषय सध्या चर्चेत आहे. मात्र, आमदार नारायण पाटील यांनी खासगी उद्योजकाला कारखाना घेऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
सुमारे ४५० कोटी रुपये मालमत्ता असणारा आदिनाथ साखर कारखाना १२० कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओंकार शुगर कारखान्याच्या आडून कोणी राजकीय शक्तीचा वापर करून आदिनाथ कारखाना विकत घेण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही, अशी वार्निंग आमदार पाटील यांनी दिली आहे. एकीकडे आदिनाथ साखर कारखान्याच्या विक्रीचा मुद्दा तापलेला असताना आता तालुक्यातील दुसरे महत्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या मकाई कारखान्याचा मुद्दा पुढे आला आहे.
रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या भाजप प्रवेशानंतर मकाई साखर कारखान्याला एनसीडीसीकडून १४० कोटी रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले होते, त्यानंतर संबंधितांना तो कारखाना पुन्हा व्यवस्थितरित्या चालवता आलेला नाही. आता एनसीडीसी मकाई कारखाना ताब्यात घेण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर कारखान्याची मशिनरी भंगारात विक्री केली जात असल्याचा आरोप माजी अध्यक्ष झांजुर्णे यांनी केला आहे.
कारखान्याची मशिनरी भंगारात विकण्याची वेळ का आली, आपलं घरं कोणी भंगारात विकता का, कारखान्याची मशिनरी १५ ते २० ट्रक भरून भंगारात का विकावी लागत आहे. आम्ही रक्ताचे पाणी करून मकाई कारखाना शेतकऱ्यांच्या मदतीतून आम्ही उभा केला आहे. त्या कारखान्याची मालमत्ता भंगारात विक्री करण्याचा अधिकार कोणी दिला, असा तिखट सवालही माजी अध्यक्ष झांजुर्णे केला आहे.
दरम्यान, कारखाना चालवता येत नाही म्हणून मशिनरी भंगारात विकणे कितपत योग्य आहे. कारखाना का बंद पडला. सरकारकडून मिळालेल्या निधीचे काय झाले. शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेल्या मकाई साखर कारखाना विक्रीचा अधिकार विद्यमान पदाधिकाऱ्यांना कोणी दिला, अशीही विचारणा आप्पासाहेब झांजुर्णे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.