

प्रथमेश कोठेंचा भाजपत प्रवेश:
सोलापूरचे माजी महापौर (स्व.) महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी पाच माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ:
हा प्रवेश आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण कोठे कुटुंबाचा शहरातील प्रभाव लक्षणीय आहे.
कोठे परिवाराची एकजूट:
आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नाने प्रथमेश कोठे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश केला, ज्यामुळे कुटुंबातील संभाव्य संघर्ष टळला आहे.
Solapur, 12 November : सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महापालिकेवर अनेक वर्षे वर्चस्व राखलेल्या कोठे परिवारातील माजी महापौर (स्व.) महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रथमेश यांच्यासह कोठे समर्थक सहा माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे.
माजी महापौर (स्व) महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे (Prathamesh Kothe) यांच्यासह त्यांचे समर्थक माजी नगरसेवकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार, याची सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. त्यामुळे बहुचर्चित असलेला प्रथमेश कोठे यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पवारांची साथ सोडून भाजपत दाखल होण्याचा निर्णय घेतल्याने शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडले आहे.
भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात मंगळवारी (ता. ११ नोव्हेंबर) रात्री उशिरा हा भाजप (BJP) प्रवेशाचा सोहळा पार पडला. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वातील या कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह कोठे कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.
माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकारम या कोठे कुटुंबीयांसह त्यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, शशिकांत केंची यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. मात्र, भाजपच्या एका गटाकडून इनकमिंगबाबत उघडपणे आणि छुप्या पद्धतीनेही नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीपासून भाजपच्या गोटात आलेले आणि अवघ्या काही महिन्यांत आमदार झालेले देवेंद्र कोठे यांनी आपले चुलत बंधू प्रथमेश कोठे यांच्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना भाजपमध्ये आणले आहे. त्यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमधून काय प्रतिक्रिया उमटते, हे पाहावे लागेल.
मातब्बरांनी सोडली पवारांची साथ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गेल्या काही दिवसांपासून धक्क्यावर बसत आहेत. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्ष सोडला. त्यानंतर पक्षाचे युवक शहराध्यक्ष अक्षय वाकसे, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस तुषार पवार, जोशी समाजाचे शहराध्यक्ष युवराज सरवदे, संतोष सोमा, आकाश भोसले यांनीही पक्ष सोडला आहे.
प्रथमेश कोठेंच्या भूमिकेला महत्व
सोलापूर शहराच्या राजकारणावर वर्चस्व राखून असलेल्या महेश कोठे परिवाराची आगामी महापालिका निवडणुकीत काय भूमिका असणार याची उत्सुकता होती. विशेषतः माजी महापौर (स्व.) महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्या भूमिकेकडे त्यांच्या समर्थकांसह शहराचे लक्ष लागले होते. त्यातच मंगळवारी जाहीर झालेली प्रभागाची आरक्षण सोडत ही कोठे कुटुंबीयांसाठी अनुकूल अशी निघाली आहे, त्यामुळे प्रथमेश यांच्या भूमिकेला महत्व आहे.
कुटुंबातील संघर्ष टळला
दरम्यान, राजकीय संघर्ष टाळून पुन्हा महापालिकेत वर्चस्व राखण्यासाठी कोठे परिवाराने एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. प्रथमेश कोठे आणि त्यांच्या समर्थकांना भारतीय जनता पक्षात आणण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. असे असले तरी आगामी निवडणुकीत भाजपकडून कोठे समर्थक किती जणांना उमेदवारी दिले जाते, हे पाहावे लागणार आहे.
Q1: प्रथमेश कोठे कोण आहेत?
A1: ते सोलापूरचे माजी महापौर (स्व.) महेश कोठे यांचे पुत्र आहेत.
Q2: त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
A2: त्यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
Q3: राष्ट्रवादी शरद पवार गटाला यामुळे काय फटका बसला?
A3: कोठे परिवाराच्या बाहेर पडण्याने पक्षातील बळकटी आणि जनाधार दोन्ही कमी झाले आहेत.
Q4: या प्रवेशामुळे भाजपमध्ये काय प्रतिक्रिया आहेत?
A4: काही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी इनकमिंगबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, तरी नेतृत्वाने स्वागत केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.