Mangalvedha, 14 September : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसंतसे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यातील अंतर वाढत चालले आहे.
चाळीस हजार मते असणाऱ्यांना पोटनिवडणुकीत मदत केली. मात्र, अनुभव वाईट आहेत. पोलिसांना फोन करून सांगितलं जातं की, ‘याला उचला, त्याला उचला.’ पण, ज्यांनी त्यांना आमदार केलं, त्यांनादेखील हे आतमध्ये टाकतील,’ असा गंभीर आणि खळबळजनक आरोप माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नाव न घेता आमदार समाधान आवताडे यांच्यावर केला.
मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटातील परिचारक गटाच्या कार्यकर्त्याची बैठक मारोळी येथे घेण्यात आली. त्या बैठकीत बोलताना प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, कार्यकर्त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, या दृष्टिकोनातून पंढरपूरमध्ये तिरंगी लढत झाली तर जागा येत नाही; म्हणून वरिष्ठांचे ऐकून दुरंगी लढतीसाठी आम्ही चाळीस हजार मते असणारांना मदत केली. दुर्दैवाने तीन वर्षांत आलेला अनुभव चांगला नाही.
पोलिसांना फोन करून, ‘याला उचला, त्याला उचला म्हणून सांगितलं जातंय. पण, आमच्या घरात 35 वर्षे आमदारकी होती. आम्ही कधीच पोलिस ठाण्यात कुणावर गुन्हा दाखल करावा; म्हणून फोन केलेला नाही. उलट आम्ही दोन्ही गटाचे लोक समोर बसवा आणि तक्रार निकाली काढा, यासाठी आम्ही फोन केले आहेत, असा आरोप परिचारक यांनी समाधान आवताडेंवर (Samadhan Autade) नाव न घेता केला.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात तीन हजार कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मला नोटा मोजायची सवय नाही. तसेच मी उद्योगपती आणि ठेकेदारही नाही, त्यामुळे एवढा निधी आणला तरी साड्या वाटायची वेळ का आली? असा सवाल माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आवताडेंना विचारला.
माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, दामाजी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत होता. त्या वेळी (स्व.) चरणुकाका पाटील यांच्या काळात पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून वाहने व ऊस पुरवठा केला. पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून दहा कोटींची आर्थिक मदतही केली.
दामाजीचे कारखान्याचे चाक फिरताना संस्था टिकली पाहिजे, या भूमिकेतून आम्ही मदत केली. मात्र, दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी तुमच्या पार्टीचे लोक लायक नाहीत, असे सांगितले. मात्र, कारखान्याच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्यांनी आम्ही ती निवडणूक जिंकली.
मंगळवेढ्याची जनता स्वाभिमानी, शांत आणि सहनशील आहे. लोक बोलत नाहीत. पण, टेंभूचे आठ टीएमसी पाण्याचे वाटप नुकतेच झाले त्यात किमान एक टीएमसी पाणी जरी मंगळवेढा मिळाले असते, तर त्यातून 24 गावांनाही पाणी देता आले असते. मी हे टीका म्हणून बोलत नाही तर जे वास्तव आहे, ते सांगतो आहे, असेही परिचारक यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. परंतु शरद पवार यांनी काँग्रेसकडे जागा असल्याचे सांगितले होते, त्यामुळे आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी घ्यावी लागली होती. सध्याचे राजकारण अस्थिर आहे, त्यामुळे भविष्यात तुम्हा कार्यकर्त्यांना विचारूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही परिचारकांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
या वेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, गौरीशंकर बुरुकुल, महादेव लुगडे, युन्नुश शेख, बबलू सुतार, सचिन चौगुले, अशोक माळी, माधवानंद आकळे, रामचंद्र माळी, गोविंद भोरकडे, श्रीकांत गणपाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.