Solapur Dcc Bank : परिचारकांची राजीनाम्याची खेळी ठरली पॉवरफुल; DCC च्या रिंगणात कायम : मोहिते-पाटील, शिंदे, जगताप, माने, म्हेत्रे, हसापुरे, आवताडेंना धक्का

Prashant Paricharak Nomination Valid : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांचा छाननीत नामंजूर झालेला उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी मंजूर केला. त्यामुळे त्यांच्या संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 08 November : 15 दिवस अगोदर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा देण्याची माजी आमदार प्रशांत परिचारक यांची खेळी कमालीची यशस्वी ठरली आहे. कारण बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान छाननीत नामंजूर झालेला अर्ज विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रशांत परिचारक यांचा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, माजी आमदार परिचारकांना दिलासा देताना रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमाामा शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, बबनराव आवताडे यांचे अपील फेटाळले आहे. आता या ७ जणांना मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत.

सहकार आयुक्तांनी कलम ११० अ अन्वये २९ मे २०१८ रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. मात्र, तत्कालीन संचालक प्रशांत परिचारक यांनी १४ मे २०१८ रोजी संचालकपदाचा दिलेला राजीनामा विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी ग्राह्य धरत परिचारक यांचे अपील मंजूर केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी छाननीमध्ये परिचारक यांचा अर्ज अपात्र ठरविला होता. तो अर्ज आज पात्र ठरला.

परिचारक यांच्यासोबतच माजी संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे व सुरेश हसापुरे यांनीही सहनिबंधक आहेर यांच्याकडे अपील दाखल केले होते. या सात जणांचे अपील फेटाळण्यात आले आहे. फक्त परिचारक यांचे एकमेव अपील मंजूर झाले आहे.

माजी संचालक परिचारक आणि म्हेत्रे यांच्यावर कलम ११० अ नुसार कारवाई झालेली असल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. परिचारक यांनी कारवाईपूर्वी राजीनामा दिला आहे, त्यामुळे त्यांचे अपील मंजूर होऊन डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीतील उमेदवारी कायम राहिली आहे.

Prashant Paricharak
kalyanshetti Vs Mhetre : सचिन कल्याणशेट्टींना डीसीसी बॅंकेवर का जायचंय? सिद्धाराम म्हेत्रेंनी केला मोठा गौप्यस्फोट

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी परिचारक यांच्यासह आठ जणांचे अर्ज छाननीमध्ये अपात्र ठरविण्यात आले होते. या आठ जणांनी त्याविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपिल केले होते. त्या अपिलावर सहनिबंधक आहेर यांच्याकडे सुनावणी झाली.

सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सुनावणीनंतर दहा दिवसांच्या आत आदेश द्यावा लागतो. सध्या दिवाळी व शासकीय सुट्या असल्याने या सुनावणीचा आदेश दिवाळीनंतर येईल, अशी चर्चा होती. सहनिबंधक आहेर यांनी मात्र अवघ्या एका दिवसात या प्रकरणाचा आदेश देऊन दिवाळीपूर्वीच डीसीसीच्या राजकारणात मोठा धमाका उडवून दिला आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुका सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघातील त्यांची उमेदवारी आता कायम राहिली आहे.

Prashant Paricharak
Shinde's Leader Controversial Statement : एकनाथ शिंदेंच्या माजी आमदाराने मोदींचा बाप काढला; म्हणाले, ‘ते पैसे तुमचे आहेत; मोदींच्या XXX नाहीत'

हायकोर्टात धाव घेणार

सहनिबंधक आहेर यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात आम्ही येत्या सोमवारी (ता. ९ नोव्हेंबर) उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, असे ॲड. उमेश मराठे यांनी सांगितले. ॲड. मराठे हे संजयमामा शिंदे, दिलीप माने, बबनराव आवताडे व सुरेश हसापुरे यांचे वकील आहेत.

डीसीसीच्या निवडणुकीची सध्या अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज माघारीसाठी १७ नोव्हेंबर हा अंतिम दिवस आहे. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची निवडणूक चिन्हांसह यादी १८ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी अपात्र उमेदवारांनी त्यांच्या बाजूने निकाल आणल्यास त्यांना निवडणूक लढता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.