
Kolhapur Politics : कोल्हापूरच्या राजकारणात 'पक्ष' कायमच दुय्यम ठरत होता. आतापर्यंत प्रत्येक नेत्याने आप-आपला गट बांधला आणि वाढवला. या गटाच्या माध्यमातून ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अन् गोकुळच्या निवडणुकीतील राजकारण झालं. बलाढ्य गोकुळच्या आर्थिक गडाची सुत्रं कालपर्यंत जिल्ह्यातील नेत्यांच्याच हातात होती. पण यंदा पहिल्यांदाच गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सूत्र मुंबईतून फिरली. पहिल्यांदाच राज्याच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घातले. त्यामुळे गटातटाच्या राजकारणात विभागलेल्या नेत्यांना पक्षाच्या राजकारणाची वेसण बसली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात 'गोकुळचे' अनन्यसाधारण महत्त्व आहे. वार्षिक 4 हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ही गोकुळची खरी ताकद आहे. पण त्याचबरोबर दूध संकलन आणि दूध पुरवठा यामाध्यमातून गावखेड्यात पसरलेली यंत्रणा गोकुळच्या ताब्यात आहे. त्यामुळे गोकुळवरील वर्चस्वासाठी सर्वच नेत्यांमध्ये टोकाची लढाई असते. 2021 मध्ये महादेवराव महाडिक यांच्या तब्बल 3 दशकांच्या वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी गोकुळ आपल्या ताब्यात घेतले.
यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांचा. त्यांनी त्यांचे ठरावधारक मुश्रीफ आणि पाटील यांच्यामागे उभे केले. सत्तांतर झाल्यानंतर सुरुवातीला अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आग्रही होते. पण ज्येष्ठतेच्या मुद्दयावर विश्वास पाटील यांना सुरुवातीचे 2 वर्षे अध्यक्षपद दिले गेले. त्यानंतर पुढची 2 वर्षे डोंगळे यांना दिले. तर उर्वरित एका वर्षाच्या अध्यक्षपदाचा निर्णय त्यावेळी बैठकीत घेण्यात येईल असे ठरले.
पण मागच्या 3 वर्षांत राज्याच्या राजकारणात कमालीचे परिवर्तन झाले. त्याचा थेट परिणाम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणावर झाला. या सत्तांतराची झळ कोल्हापूरलाही बसली. महाडिक भाजपवासी झाले, मुश्रीफ महायुतीत गेले. तर सतेज पाटील महाविकास आघाडीत राहिले. गोकुळचे अध्यक्ष असलेले अरुण डोंगळे शिवसेनेकडे झुकले. आता उर्वरित एका वर्षाचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा होऊ लागताच डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीनंतर गोकुळचा पुढचा अध्यक्ष महायुतीचा होणार असेल तरच आपण राजीनामा देऊ, असे म्हणत बंडाची भूमिका घेतली. त्यांच्या या बंडानंतर गोकुळमध्ये एकच खळबळ उडाली. सुरुवातीला मुश्रीफ आणि पाटीलही अस्वस्थ झाले. पण अवघ्या एका दिवसात दोघांनीही 18 संचालकांची एकजूट केली अन् डोंगळे यांना एकाकी पाडले. त्यानंतरही डोंगळे यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेत नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी कोणते नाव येते याची वाट पाहिली.
या दरम्यानच्या काळात मुश्रीफ यांनी फडणवीस आणि शिंदे यांची समजूत काढून त्यांना गोकुळमध्ये लक्ष न घालण्याची विनंती केली. पण सतेज पाटील यांचे समर्थक असलेल्या शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव पुढे येताच डोंगळे यांनी चाली रचल्या. त्यांच्या चालीला धनंजय महाडिक यांनी पडद्याआडून साथ दिली. गोकुळच्या अध्यक्षपदावर काँग्रेसधार्जिणा चेहरा नकोच अशी भूमिका महाडिक यांनी घेतली आणि राज्यातील नेत्यांना पुन्हा हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
गोकुळची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मागे उभी राहिली तर महायुतीला अवघड जाईल. त्यामुळे आता पुन्हा हस्तक्षेप कराच, असे महाडिक यांनी फडणवीस आणि शिंदे यांना सांगितले. अखेर शेवटच्या 2 दिवसांत मुंबईतून हालचाली वाढल्या. अध्यक्षपदाचा उमेदवार बदलण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मुश्रीफ, कोरे, आबिटकर यांच्यावर दबाव आणला. यानंतर जिल्ह्यातील नेत्यांची मुंबईत बैठक झाली आणि यातच उमेदवार बदलाचा निर्णय झाला.
मुश्रीफ गुरुवारी संध्याकाळीच कोल्हापूरमध्ये दाखल झाले. इथे त्यांनी सतेज पाटील यांच्याशी पुन्हा सविस्तर चर्चा केली. आपल्याच आघाडीच्या संचालकालाच अध्यक्ष करायचे आणि सत्ताधारी आघाडी चलबिचल होऊ द्यायची नाही, अशी भूमिका घेत सर्व संमतीचा उमेदवार म्हणून नविद मुश्रीफ यांचे नाव पुढे आले. नविद मुश्रीफ हे पाटील आणि मुश्रीफ यांच्या पॅनेलकडून निवडून आले आहेत. मात्र राज्यातील सत्तेत मुश्रीफ महायुतीत आहेत.
आता यापुढे गोकुळच्या निवडणुका पक्ष संघटनेच्या आडूनच आघाडी म्हणून होतील, यात कोणतीही शंका राहिलेली नाही. गोकुळचा अध्यक्षही यापुढे मुंबईतूनच ठरणार, हे यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात 'मी' म्हणेल तेच खरं हे यापुढे चालणे अवघड दिसते. नेत्यांना मुंबईतूनच वेसण घालण्यात आली आहे. यापुढील काळात महायुतीची ही वेसण अधिक घट्ट होऊ शकते. कारण त्यांना आपला राजकीय विस्तार वाढवायचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.