

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील माजी संचालक पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भोर तालुक्यातील किकवी येथील 'अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड' या प्रकल्पाच्या खरेदीत तब्बल ९५ कोटी ६ लाख रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.
याप्रकरणी विभागीय उपनिबंधक रणजीत परजणे यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली असतानाच, आता भाजपनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांची भेट घेऊन किकवी दूध पॅकिंग प्लांट खरेदी व्यवहार आणि दूध पॅकिंग खर्चाबाबत सविस्तर 'श्वेतपत्रिका' सादर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या खरेदी व्यवहाराबाबत सर्वसामान्यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये आणि राजकीय वर्तुळात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे गोकुळ प्रशासनाने अधिकृत खुलासा करून पारदर्शकता दाखवावी, असा सूर आता उमटू लागला आहे. माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत, राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना मागणी करत आहेत. त्यामुळे संस्थेने या संपूर्ण व्यवहारावर सविस्तर श्वेतपत्रिका काढून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी निंबाळकर यांनी केली.
दरम्यान, आमदार सतेज पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीवर भाष्य करताना नाईक-निंबाळकर यांनी राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला उधाण आणले आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत असेल, तर मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वेगळा विचार केला तर गैर काय? गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे, असे सूचक विधान त्यांनी केले.
तिसरा कोण?
दरम्यान, राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी टीका केल्यानंतर तिसरा व्यक्ती कोण, असा सवाल सर्वसामान्य जनतेला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या अनेक दशकांपासून गोकुळसह इतर राजकारणात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून महाडिक गटाकडे पाहिले जाते. गोकुळ दूध संघातील राजकारणात अलीकडे महाडिक विरुद्ध पाटील असा संघर्ष उफाळत आहे.
अशातच मागील पाच वर्षांत इंट्री झालेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाने गोकुळच्या राजकारणात आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे वक्तव्य कोणाला उद्देशून होते? यावर बराचसा राजकीय खल आणि चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.