

Gokul Election : काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी नुकतचं सकाळसोबत बोलताना गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांचे खंडन केले. मात्र गोकुळला जिल्ह्याचं आर्थिक आणि राजकीय केंद्र समजल्या जाणाऱ्या, शिवाय प्रत्येक नेत्यांसह दूध उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या संघाची निवडणूक बिनविरोध होईल का? अशी शंका कुणाच्याच मनात येणार नाही.
मग गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार ही टूम नेमकी कुठून आली? हा खरंच राजकीय चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे. पण हीच बिनविरोधची टूम जाणून बुजून गोकुळच्या राजकारणात ती पेरली गेली का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोकुळच्या राजकारणात का आणले गेले? या निवडणुकीला पहिल्यांदाच इतका राजकीय रंग का दिला गेला? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे गेल्या चार ते पाच महिन्याच्या घडामोडीत दडली आहेत.
मागील निवडणुकीत महाडिक गटाला हद्दपार केलं :
गतवेळची गोकुळ दूध संघाची निवडणूक एकमेकांचं अस्तित्व संपवण्यासाठी झाली होती. यंदा ही निवडणूक वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मागील निवडणुकीत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा फायदा घेत गोकुळच्या निवडणुकीतून महाडिक गटाला हद्दपार करण्याचं हेतू डोळ्यासमोर ठेवून लढवली गेली. सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि विनय कोरे यांनी एकत्र येत महाडिक गटाची गोकुळवरील 25 वर्षांची सत्ता खालसा केली.
2021 मध्ये ही निवडणूक झाली तेव्हा गोकुळचे सभासद 3800 इतके होते. आता 5 वर्षाच्या कार्यकाळात गोकुळचे सभासद जवळपास 1800 ने वाढून त्यामध्ये 5,447 इतकी वाढ झाली. केवळ महाडिक वगळता या सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांना सभासद आणि संस्था नव्याने नोंदणी करून देण्यात आल्या. गोकुळच्या राजकारणात ‘ज्याचे ठराव अधिक, त्याच्याकडे सत्ता’ हे सूत्र लागू पडते. म्हणूनच वाढवलेल्या दूध संस्थांवरून गेल्या पाच महिन्यात गोकुळचे राजकारण उफाळून आले.
राज्यातील समीकरण बदललं अन् गोकुळही बदललं :
पाच वर्षात गोकुळच्या राजकारणाबरोबर राज्यातील राजकीय समीकरणही बदलली. भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरण गुंतागुंतीची बनली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, यांच्याबरोबर आमदार अमल महाडिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक विनय कोरे हे एकाच युतीतील झाले. तर आमदार सतेज पाटील हे एकटे पडले.
गोकुळ ही राज्यातील सर्वात मोठी दूध संस्था आहे. सहकार संस्था चालवण्यासाठी राज्यातील सरकारच्या विरोधात जाऊन चालणार नाही हे सत्य मानून सध्या महायुती म्हणून निवडणुकीला एकत्र जाण्याचे ध्येय जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी ठेवले आहे. प्रवाहाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवण्यापेक्षा प्रवाहासोबत निवडणूक लढवण्याची भावना गोकुळच्या संचालकांची आणि नेत्यांची झाल्याची दिसते.
डोंगळेंच्या राजीनाम्यापासून महायुतीच्या निर्णयापर्यंत :
गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदावर अरुण डोंगळे यांची नियुक्ती झाली. त्यांचा दोन वर्ष कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतल्यामुळे तिथूनच पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आलेल्या अरुण डोंगळे यांनी मध्यंतरीच्या काळात शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन अनेक राजकीय संकेत दिले होते.
मात्र अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपताच त्यांनी राजीनामा न देण्याची घेतलेल्या भूमिकेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच हस्तक्षेप करावा लागला. चंदगडच्या एका विवाह समारंभात डोंगळे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट झाली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी डोंगळे यांना पुत्र अभिषेक डोंगळे यांच्या राजकीय भवितव्याची ग्वाही घेतल्यानंतर त्यावर पडदा पडला आणि डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तिथूनच महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार झाला. पुढील एक वर्षासाठी मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष झाले.
महाडिकांना पर्यायाने भाजपला सत्तेत स्थान देण्याचा प्रयत्न :
महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना महाडिक गटाला सत्तेत स्थान हवे आहे. त्यांना स्थान देत असताना मागील सत्तेतील सर्व संचालकांना गोकुळच्या सत्तेतील आपले स्थान अबाधित ठेवणे गरजेचे वाटते. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात होत असतानाच गोकुळच्या प्रधान कार्यालयात या सर्व संचालकांची बैठक झाली. या बैठकीत सर्वच नेत्यांची भेट घेण्याचे ठरले. गोकुळचे तत्कालीन अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालकांनी महाडिक वगळता जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्या.
या बैठकीचा हेतू केवळ एकच होता, तो म्हणजे महायुतीच्या सत्तेच्या काळात आमचे संचालकपद अबाधित रहावे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आपण सर्वच एकत्र राहू या. सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जावे, अशी भूमिका घेतलेल्या संचालकांनी त्यातूनच बिनविरोध निवडणुकीची टूम निघाली. जयसिंगपूरचे नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय यड्रावकर यांनी छाती ठोकून सांगतो गोकुळ दूध संघाची निवडणूक ही बिनविरोधच होणार, साठी मी स्टॅम्प लिहून देतो अशी भाषा केल्यानंतर ही चर्चा आणखी पुढे गेली.
महाडिकांची ताकद कमी; मग फडणवीसांची एन्ट्री?
महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना या निवडणुकीमध्ये महाडिक गट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र मागील निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे यंदा ठरावाची ताकद महाडिक गटाकडे कमी होती. तर मागील पाच वर्षात जवळपास 1800 ठराव धारकांची नव्याने नोंदणी केल्याने महाडिक वगळता सर्वच नेत्यांची राजकीय ताकद गोकुळमध्ये वाढली होती. नेत्यांचे वाढलेले ठराव हे भविष्यातील राजकीय डोकेदुखी ठरणार हे अदृश्य शक्तीला नको होते.
एका बाजूला गोकुळमध्ये महाडिक गटाची ताकद कमी असली तरी भाजप म्हणून महाडिकांची प्रमुख भूमिका गोकुळच्या राजकारणात ठेवायची आहे. अशावेळी स्थानिक नेत्यांच्या महाडिक गटावर असलेल्या नाराजीमुळे हे शक्य नाही याची जाणीव असल्यानेच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोकुळच्या राजकारणात आणले गेले. महायुती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाल्याचे सांगितले गेले.
वाढलेल्या संस्थांवरून न्यायालयीन लढाई :
त्याचवेळी आणखी एक डाव खेळला गेला. गोकुळमध्ये इतर नेत्यांची वाढलेली ताकद कमी करण्यासाठी महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांच्या माध्यमातून वाढलेल्या संस्थांबाबत तक्रारी करण्यात आल्या. गोकुळमधील वाढलेल्या संस्था, कर्मचारी-ठेकेदार यांचे ठराव, यासह विविध मुद्द्यांवर बेलवाडे यांनी न्यायालयीय स्तरावर लढाई दिली. बेलवाडे हे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ओएसडी म्हणून काम केलेले आहेत. शिवाय ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत.
बेलवाडे यांना आर्थिक रसद पुरवणारे आणि त्यांच्या न्यायालयीन लढाईमागे उभे असलेले ‘अदृश्य हात’ कोणते? हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत न्यायालयाच्या विविध टप्प्यांवर ही लढाई झाली. एवढेच नव्हे तर गोकुळला दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांनीही थेट न्यायालयाची पायरी चढली.
प्रशासकाच्या नियुक्तीवरून मुश्रीफांची नाराजी :
मागील पाच वर्षातील संचालकांचा कार्यकाळ संपताच गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमणुकीची मागणी करण्यात आली. या मागणीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोध होता. सहकार विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून देखील भाजपचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीची दखल घेत गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्यात आला. प्रशासक नेमण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना बेदखल केल्याने महायुतीमधील अंतर्गत खदखद वारंवार बाहेर पडली. महायुतीच्या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी ही खदखद आणि त्या संदर्भातील रोष व्यक्त करून दाखवला.
वाढीव संस्थांना अपात्र करण्याचा प्रयत्न?
प्रशासकाच्या माध्यमातून वाढीव दूध संस्थांना अपात्र करण्याची भूमिका घेण्यात आली. मात्र न्यायालयीन लढाईत या संस्था कायद्याच्या चौकटीत राहिल्या. गोकुळमधील अपात्र केलेल्या संस्था या न्यायालयीन लढाईत जिंकत असल्याचे लक्षात येताच पुन्हा एकदा ही निवडणूक बिनविरोधच्या उंबरठ्यावर जाणून बुजून आणण्यात आली. आता अदृश्य शक्तीला कोणताच पर्याय उरत नसल्याने अखेर सर्व नेत्यांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरु झाला.
गोकुळमधील संस्थांना न्यायालयाची पायरी चढावी लागल्यामुळे अनेकांमध्ये त्या अदृश्य शक्ती बद्दल नाराजी आहे. ही नाराजी विविध घटनांमधून उघड होत असल्याने या अदृश्य शक्तीने देखील आपली भूमिका मवाळ केल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत या संस्थांची नाराजी आपल्यावर उमटेल हीच भीती आणि शक्यता सध्या वर्तवली जात आहे. गोकुळमधील दूध संस्थांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्यामुळे आणि झालेल्या त्रासामुळे या संस्था आज ही कमालीच्या नाराजीच्या आहेत.
विश्वास पाटील गटाची नाराजीही महत्त्वाची :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महत्त्वाचे मानले जाणारे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा गटही नाराज असल्याचं बोलले जाते. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पराभव करण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा व्हायरल झालेला कॉल हा देखील तितकाच कारणीभूत ठरू शकतो. मागील पाच महिन्यातील राजकीय घडामोडीमुळे नाराज झालेले सभासद या निवडणुकीत सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि चंद्रदीप नरके यांच्या बाजूने राहू शकतात ही शक्यता जवळपास निश्चित आहे. याचीच भीती अदृश्य शक्तीला लागल्यामुळे पुन्हा एकदा ही निवडणूक बिनविरोध करावी अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.
सतेज पाटलांनी बिनविरोधचा खेळच संपवला?
मात्र गेल्या पाच महिन्यातील राजकीय घडामोडीचा अंदाज पाहून त्याचा तोटा कोणाला होणार? त्याचा फायदा कोणाला होणार? हे सतेज पाटील यांनी ओळखल्याने सहाजिकच त्यांनी ही निवडणूक होणारच आणि आमचे 25 उमेदवार तयार आहेत. अशी भूमिका व्यक्त केली. याचाच अर्थ कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघाची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही हे नक्की झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.