

Gokul Milk Rate: वाढते इंधन दर, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती तसंच वाहतूक, पॅकेजिंग व इतर अनुषंगिक खर्चांमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघानं गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गोकुळ दूध संघाच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, ही दरवाढ २१ मे २०२६ पासून कोल्हापूर, पुणे, मुंबई व कोकण विभागातील सर्व शहरांमध्ये लागू होणार आहे.
या दरवाढीत गोकुळच्या (गाय दूध, टोन्ड, शक्ती व स्टँडर्ड) या दूध प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळं वाढत्या महागाईच्या काळात ग्राहकांवरील अतिरिक्त आर्थिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाने यापूर्वी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया व गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली होती. त्यावेळी गायीच्या दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ न करता ग्राहकांनाही दिलासा देण्यात आला होता.
सध्याच्या परिस्थितीत इंधन दरवाढ, कच्च्या मालाच्या किंमती, वाहतूक, पॅकेजिंग व इतर अनुषांगिक खर्चामध्ये झालेली वाढ लक्षात घेता दरवाढ अपरिहार्य असली तरी गोकुळने ती अत्यंत मर्यादित ठेवत जबाबदार भूमिका घेतली आहे. या संदर्भात प्राधिकृत मंडळाच्या अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच ग्राहकांना दर्जेदार दूध वाजवी दरात उपलब्ध राहावे, या समतोल दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादन व बाजार परिस्थितीचा आढावा घेऊन दूध खरेदी-विक्री दराबाबत पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक, सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.