

Gokul Election: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघातील अवसायानात निघालेल्या किती संस्था पात्र आणि किती अपात्र ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच या संबंधित आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झाली नसली तरीही अधिकाऱ्यांनी एका व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे ही आकडेवारी जाहीर केली आहे.
चार दिवसांपासून सहायक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे हे सोमवारी (ता. १५) पात्र-अपात्र संस्थांची आकडेवारी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत होते. सकाळी त्यांनी दुपारी जाहीर करणार, असे सांगितले. दुपारी सायंकाळी जाहीर करणार, असे सांगितले. सायंकाळनंतर रात्री दहापर्यंत ही आकडेवारी त्यांनी जाहीर केली नाही.
रात्री ठाकरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. ही आकडेवारी का जाहीर करत नाहीत? त्यामागे कोणाचा दबाव आहे? अपात्र झालेल्या संस्था पुन्हा पात्र करण्यासाठी लक्ष्मीलाभाची आशा अधिकाऱ्यांना आहे का असे सवाल उपस्थित झाले होते.
दिवसभरात आकडेवारी जुळत नसल्याचे अधिकारी सांगत होते. वारंवार दिरंगाई वाढत असल्यामुळे सायंकाळी काही संस्था प्रतिनिधींनी येऊन आम्ही पात्र की अपात्र याबाबत थेट ठाकरे यांच्याकडे चौकशी केली. त्यांनाही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पात्र-अपात्र संस्थांची आकडेवारी केव्हा जाहीर होणार? याकडे आता संस्था प्रतिनिधींचे लक्ष लागले होते.
सोमवारी सायंकाळपर्यंत समाजमाध्यमांवर ६५० पेक्षा अधिक दूध संस्था अपात्र झाल्याचा मेसेज व्हायरल होत होता. मात्र ही आकडेवारी चुकीची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अखेर मंगळवारी एका व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे १०५३ दूध संस्था पैकी ३७७ इतक्या संस्था पात्र करण्यात आल्या. तर ४४१ अपात्र करण्यात आल्या आहेत. अद्यापही २३५ संस्थांचा निकाल बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे.
६५० वरून आकडा थेट ४४१ वर?
आधी ६५० संस्था अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अधिकाऱ्यांनी या आकड्याला दुजोरा दिला नाही. पण आता ४४१ संस्था अपात्र ठरल्या आहेत. आता या कमी झालेल्या आकड्यामागे लक्ष्मी लाभ की अधिकाऱ्यांवर कोणता दबाव होता? असे सवाल उपस्थित होत आहेत.
करवीर तालुक्यातून सर्वाधिक ठराव
आजपर्यंत एकूण ८४ दूध संस्थांनी त्यांचे ठराव सहाय्यक दुग्ध विभागात दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या करवीर तालुक्याची आहे. आजरा १९, करवीर २२, कागल १, गगनबावडा १, गडहिंग्लज १७, चंदगड ७, पन्हाळा १, भुदरगड २, राधानगरी २, शाहूवाडी २, शिरोळ २ आणि हातकणंगले ८ असे ठाराव दाखल झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.