
Pandharpur, 29 May : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पंढरपुरात आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाच्या प्रश्नावरून पत्रकारांनी भंडावून सोडले. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदामुळे आम्हाला आनंद झाला आहे, असे सांगून पडळकरांनी विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप तुमचा मतांसाठी उपयोग करून घेतंय का? तुमचं भाजपवर एकतर्फी प्रेम आहे का, असा प्रश्नांचा भडिमार पडळकरांवर करण्यात आला. मंत्रिपदाच्या प्रश्नाला वैतागलेल्या पडळकारांनी शेवटी हात जोडले आणि दोन दिवस आमचं व्यवस्थित जाऊ द्या, अशी विनंती केली.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना त्यांच्या मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत, ते आता मंत्री झाले आहेत, त्याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे. आम्ही भारतीय जनता पक्षासोबत कायम राहतोय. माझ्या मंत्रिपदाचा विषय हा वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आमच्यासाठी महत्वाचे आहे, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.
आमदार पडळकर म्हणाले, भारतीय जनता पक्ष (BJP) आमच्या प्रश्नांचा विचार करत आहे. पूर्वी आम्हाला कोणी विचारत नव्हतं. आम्हाला कोणी जवळही येऊ देत नव्हतं. साधं चार ओळींचं पत्रही काढलं जात नव्हतं. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी, असे पत्र काढावे, असा चार ओळीचा शासन निर्णय करायचा होता. त्यासाठी एक रुपयाचे बजेट लागणार नव्हते. पण, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना तो निर्णय घ्यावा, असं वाटलं नाही. पण, देवेंद्र फडणवीसांना वाटलं की अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सरकारी पातळीवर साजरी झाली पाहिजे आणि त्यांनी तो निर्णय घेतला.
सरकारी ताकद काय असते, याचा अनुभव आम्ही घेतला आहे. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय झाल्यानंतर शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांनी पळापळी करून अहिल्यादेवींचा फोटो आणून जयंती साजरी केली. नगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे करण्यात आले. औरंगाबादचे संभाजीनगर व्हायला अनेक वर्षे लागली. पण फडणवीस यांनी वर्षभरात नगरचे नामकरण केले, असा दावाही पडळकर यांनी केला.
धनगर समाजाला वाटतंय की सरकारमध्ये आपल्या समाजाचा नेता हवा. पण, तो माझा विषय नाही. समाजाच्या त्या भावना आहेत. पण ते माझ्या हातात नाही. मंत्रिपदावरून कोंडी पकडले गेल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शेवटी हात जोडत हे बघा अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. दोन दिवस आमचं व्यवस्थितपणे चालू द्या, अशी विनंती पडळकर यांनी केली.
तुमचं भाजपवर एकतर्फी प्रेम आहे का? या प्रश्नावर मंत्रिपद हा माझा विषय नाही, आमच्यासाठी तो महत्वाचा विषय नाही. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरोघरी, गावागावांत होणं, सर्व परिसरात सर्व समावेशक जयंती साजरी होणं, हा आमचा अत्यंत महत्वाचा विषय आहे. तो विषय आमच्यासाठी मंत्रिपदापेक्षा महत्वाचा आहे, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.