Hatkanangale LokSabha Constituency : आघाडी-युतीला बाजूला सारून राजू शेट्टींचा सवतासुभा मतदारांना भावणार ?

Hatkanangale Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आतापासूनच दंड थोपटले...
Hatkangale Lok Sabha Constituency
Hatkangale Lok Sabha Constituency Sarkarnama
Published on
Updated on

LokSabha Election 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 2024 ची लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आतापासूनच दंड थोपटले आहेत. मात्र महाविकास आघाडीबरोबर सुरू असलेल्या चर्चेतल्या बातम्यांचे खंडन करीत 'स्वाभिमानी' स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट आणि राष्ट्रवादीशी सुरू असलेली चर्चा यामुळे महाविकास आघाडी हातकणंगलेत उमेदवार देणार नाही, हे नक्की आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीला उमेदवार देण्यापेक्षा भाजपची एक जागा कशी कमी करता येईल? याकडे लक्ष आहे. अशा परिस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये बलाढ्य झालेली भाजप आणि शिंदे गटाची युती राजू शेट्टी भेदतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्या ठिकाणी भाजप किंवा शिंदे गटाचा उमेदवार बदलल्यास शेट्टी यांना आव्हान असणार आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या जागी महाडिक किंवा आवाडे घराण्यातील उमेदवार दिल्यास हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तुल्यबळ होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Hatkangale Lok Sabha Constituency
Kolhapur Loksabha 2024 : कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे? 'मविआ' उमेदवाराचा सस्पेन्स कायम

नाव (Name)

राजू ऊर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी

जन्मतारीख (Birth date)

1 जून 1967

शिक्षण (Education)

मेकॅनिकल इंजिनिअर

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

राजकारणची कोणतेही पार्श्वभूमी नसणाऱ्या अण्णा शेट्टी यांचा प्रमुख व्यवसाय शेती. अण्णा शेट्टी व रत्नाबाई यांना एकूण 9 अपत्ये होती. सहा मुले आणि तीन मुली. यात राजू शेट्टी सहाव्या क्रमांकाचे अपत्य आहेत. धन्यकुमार, अशोक, सुभाष, अजित, विजय, देवाप्पा ऊर्फ राजू, विमल, सुरेखा आणि कमल अशी नऊ भावंडे. लहानपणापासून बहीण कमल यांच्याकडेच राजू शेट्टी यांचे शिक्षण झाले. शेट्टी यांच्या पत्नीचे नाव संगीता असून, त्यांना सौरभ नावाचा मुलगा आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (LokSabha Constituency)

हातकणंगले

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Hatkangale Lok Sabha Constituency
Hatkanangle Lok Sabha Constituency: धैर्यशील माने यांचा डबलधमाका वाजणार का? ठाकरे गटाचे आव्हान पेलणे कठीण

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामुळे 30 वर्षांपूर्वी शेतकरी अडचणीत येत असल्याची परिस्थिती होती. नियम आणि अटींच्या जोरावर आणि शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारांनी आपल्या आर्थिक बाजू भक्कम करून घेतल्या होत्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 1980 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना झाली.

शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कांदा, ऊस, तंबाखू, भात अशी पिके पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य पैसे मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशील होती. मुळातच शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण राजू शेट्टी नावाच्या तरुणाला होती. त्यावेळी शिरोळ ग्रामपंचायत सदस्य होण्याची महत्त्वाकांक्षा ठेवून राजू शेट्टी नावाचा तरुण झटत होता. पण ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने शेट्टी नाराज झाले. 1994 मध्ये शेतकरी संघटनेचे नेते अजित नरदे यांनी राजू शेट्टी यांना सोबत घेतले. त्यांच्याकडे शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुकाप्रमुख म्हणून काम सोपवण्यात आले.

तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, उसाला योग्य दर मिळावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. उसाला प्रतिटन 1200 रुपये दर मिळावा, यासाठी राजू शेट्टी यांनी 2002 मध्ये आंदोलन केले. त्या आंदोलनात शेट्टी जखमी झाले होते. त्यावेळी हे आंदोलन चांगलेच गाजले होते. तेथूनच राजू शेट्टी हे शेतकरी संघटनेचे नेते म्हणून पुढे आले. 2003 मध्ये ते कोल्हापूर जिल्हा परिषदेवर निवडून आले.

Hatkangale Lok Sabha Constituency
Lok Sabha Election 2024 : महायुतीचे ठरेना! कोल्हापूर, हातकणंगलेचा घोळ दिल्ली दरबारी

2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेने भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही, अशी भूमिका घेत राजू शेट्टी तटस्थ राहिले. शेट्टी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर 2004 मध्येच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार सा. रे. पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश केला. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी 2009 मध्ये शेट्टी यांनी लोकसभेच्या निवडणुकीला इचलकरंजी मतदारसंघात राष्ट्रावादीच्या निवेदिता माने यांच्याविरोधात दंड थोपटले.

माने यांच्या वर्चस्वाला धक्का देत शेट्टी लोकसभेत पोहोचले. निवेदिता माने या बाळासाहेब माने यांच्या स्नुषा. माने घराण्याला पराभूत करण्याच्या हेतूने त्यावेळी काँग्रेसच्या एका गटाने शेट्टी यांना मदत केली होती. त्यानंतर 2014 मध्ये काँग्रेसचे कलाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव करीत शेट्टी दुसऱ्यांदा खासदार झाले, तर 2019 ला निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी पराभवाचा वचपा काढत राजू शेट्टी यांचा पराभव केला.

Hatkangale Lok Sabha Constituency
Swabhimani Protest: ऊस दरासाठी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक; वसंतदादा कारखान्यात कार्यकर्ते घुसले

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

राजू शेट्टी हे विद्यार्थीदशेपासूनच पर्यावरण चळवळीत सहभागी होते. त्यांनी पहिले आंदोलन पाण्यासाठी केले. 11 व 13 नो्हेंबर 2000 मध्ये मिरज (जि. सांगली) येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या आठव्या अधिवेशनाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. देशभरातून दोन लाख शेतकरी प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित होते. शेतकरी अधिवेशनाचे कार्याध्यक्ष म्हणून संयोजनाची यशस्वी जबाबदारी पार पाडल्याची दखल घेऊन संघटनेने मे 2001 मध्ये महाबळेश्वर (जि. सातारा) येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांची निवड केली.

नोव्हेंबर 2002 मध्ये उसाला प्रतिटन 800 रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी बेमुदत ऊसतोड बंद आंदोलनास सुरुवात केली. आंदोलन यशस्वी करून सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या मालाचा भाव स्वतः ठरविला व तो वसूल करून घेतला. ही घटना म्हणजे शेतकरी चळवळीसाठी मैलाचा दगड ठरली. जुलै 2005, 2019 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे सर्वात जास्त पशू व वित्तहानी शिरोळ तालुक्याची झाली. शेट्टी यांनी जीव धोक्यात घालत होडीने फिरून लोकांना मदत केली होती. गेली 23 वर्षे ऊस परिषद घेऊन महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळवून दिला आहे. दूध आंदोलनाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. यासाठी त्यांचा सतत 12 वर्षे संघर्ष सुरू आहे.

Hatkangale Lok Sabha Constituency
Hatkanangale Election : हातकणंगले उपनगराध्यक्ष निवडीत व्हीप डावलला; महाआघाडी काय भूमिका घेणार?

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची 34 मुले शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्थेच्या (जयसिंगयूर) माध्यमातून दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सोय केली. यासह साखर कारखान्यातील ऊसतोडणी कामगारांच्या व वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा चालविणे, कृषी औद्योगिक, पशुप्रदर्शनाचे त्यांनी आयोजन केले. कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी कॅन्सर परिषद, पाणी तपासणी, कोरोनाकाळात आरोग्य केंद्रांना लोकवर्गणीतून पीपीई कीट, सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यासाठी शेट्टी यांनी पुढाकार घेतला.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

शेट्टी यांनी 2009 ची लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा ९४० मतांनी पराभव झाला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य करून लोकसभेवर विजय मिळवला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी होती. 2014 मध्ये मोदींची लाट असताना त्यांनी काँग्रेसविरोधात रान उठवून भाजप - शिवसेनेच्या साथीने विजय मिळवला. मात्र दीड वर्षातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी गट्टी केली. दोन्ही काँग्रेसने जागावाटपात 2019 च्या निवडणुकीत हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना दिली. दहा वर्षे लोकसभा सदस्य असल्यामुळे जनतेमध्ये शेट्टी यांच्याबद्दल नाराजी होती. त्यात महायुतीने तरुण चेहरा म्हणून माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली.

Hatkangale Lok Sabha Constituency
Raju Shetti News : राजू शेट्टी कोणा सोबत, प्रचाराचा नारळ फोडताच जाहीर केला निर्णय

मोदीलाटेत लोकसभेला तरुण आणि उमदा उमेदवार दिल्याने मतदारांनी माने यांच्या पदरात दान टाकले. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडली. राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद झाल्यामुळे इस्लामपुरातील सदाभाऊंना मानणारा गट राजू शेट्टींच्याविरोधात उभा राहिला. काही वेळा भाजप आणि शिवसेना, तर काही वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी भूमिका शेट्टी यांची राहिल्याने कदाचित ते मतदारांना पटले नाही. आपल्या बेरजेच्या राजकारणासाठी सोयीस्कर भूमिका घेणे हे जनतेच्या लक्षात आल्यानंतर शेट्टी यांना फटका बसला.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

राजू शेट्टी यांचा मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून असो किंवा पदयात्रांच्या माध्यमातून, त्यांनी आपला जनसंपर्क भक्कम ठेवला आहे. मतदारसंघातील सहाही तालुक्यांत त्यांनी शेतकऱ्यांना आंदोलनाच्या माध्यमातून आपल्यासोबत ठेवले आहे. शेतकऱ्यांचा आश्वासक चेहरा म्हणून सद्यःस्थितीत राजू शेट्टी यांच्याकडे पाहिले जाते.

Hatkangale Lok Sabha Constituency
बघा जरांगेंची भेट घेतल्यानंतर राजू शेट्टी काय म्हणाले ? | Raju Shetti On Manoj Jarange Patil

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कमतरता जाणवली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत या चॅनेलच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी सोशल मीडियातल्या प्रत्येक समाजमाध्यमावर आपल्या भूमिका स्पष्ट करीत राहिले आहेत.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

२०१९ च्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी प्रचारात मराठा समाजाचा युवक हा मुद्दा काढल्याने मराठा समाजात एकी निर्माण झाली. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा विरुद्ध जैन समाज अशी निवडणूक झाली. खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलताना ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे कथित वक्तव्य केले होते. त्यावरून निवेदने, पत्रकबाजी झाल्यानंतर खासदार शेट्टी यांना ब्राह्मण समाजाची माफी मागावी लागली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष शरद जोशी

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आतापर्यंत सत्तेत असो वा नसो त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबतची नाळ कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी शेट्टी यांची भूमिका प्रामाणिक राहिली आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

बेरजेच्या राजकारणासाठी राजू शेट्टी हे सतत भूमिका बदलत असतात. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार, याचा एकतर्फी निर्णय शेट्टीच घेत असल्याचे दिसून येते. शिवाय आंदोलन यशस्वी टप्प्यावर आले असताना त्यामध्ये तडजोड करणे हे संघटनेसाठी मारक ठरत आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. वास्तविक पाहता, महाविकास आघाडीचे लक्ष स्वतःच्या विजयापेक्षा भाजपची एक जागा कशी कमी करता येईल, याकडे अधिक आहे. महाविकास आघाडीने या ठिकाणी उमेदवार दिल्यास भाजपचा फायदा होऊ शकतो तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नुकसान होणार होऊ शकते.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com