

Solapur, 07 August : सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने काबीज केलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत नाराजीही मोठ्या प्रमाणात असल्याचे हळूहळू पुढे येऊ लागले आहे. त्यातच शहरातील दोन वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी काही सलोख्याचे संबंध नाहीत, हे जगजाहीर आहे. भाजपमधील दोन गटांत कायम कुरघोड्या होत असतात, त्या पार्श्वभूमीवर दोन देशमुखांची भेट होऊन दोघांमध्ये सुमारे तासभर खलबतं झाली आहेत, त्यामुळे देशमुखांच्या भेटीची सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
माजी सहकार मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांनी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमार तासभर या नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोघांनी ही भेट वैयक्तिक कामानिमित्त असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सोलापूर महापालिकेतील सध्याचा कारभार त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकीपूर्वी महापालिकेत प्रशासक होते. तो कालावधी आणि सध्याच्या भाजप पदाधिकारी कार्यकाळात सुरू असलेल्या कारभाराचा आढावा या दोन्ही देशमुखांनी बैठकीत घेतला. काही विभागांमध्ये सुरू असलेला भ्रष्ट कारभार, त्याचा शहराच्या विकासकामांवर होत असलेला परिणाम आणि नागरिकांमध्ये निर्माण होत असलेली नाराजी यावर दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याचे समजले.
महापालिकेतील काही ठराविक नगरसेवकांच्या मनमानीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी संघटनात्मक स्तरावर अधिक समन्वयाची गरज असल्याचे मतही या वेळी मांडले गेले. पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये अपेक्षित एकी नसल्याने विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असून त्याचा फटका शहरातील प्रलंबित प्रकल्पांना बसत असल्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
नगरसेवकांकडून सातत्याने मांडल्या जाणाऱ्या तक्रारी, प्रशासकीय निर्णयप्रक्रिया आणि विकासकामांच्या अंमलबजावणीतील अडचणी यावरही दोन्ही नेत्यांमध्ये मंथन झाले. मात्र या बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले किंवा पुढील रणनीती काय असेल, याबाबत दोन्ही आमदारांनी मौन बाळगले. त्यांनी ही भेट वैयक्तिक स्वरूपाची असल्याचेच स्पष्ट केले. मात्र, महापालिकेच्या सद्यस्थितीवर झालेल्या चर्चेमुळे या भेटीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
नियमित भेट; राजकीय चर्चा नाही : सुभाष देशमुख
आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी झालेली ही भेट नियमित होती. यापूर्वीही आम्ही एकमेकांना भेटलो आहोत. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
शहरातील विकास कामांवर चर्चा झाली : विजय देशमुख
आमदार सुभाष देशमुख हे वैयक्तिक कामासाठी माझ्या घरी आले होते. या भेटीदरम्यान सोलापूर शहरातील विकासकामे आणि शहरातील प्रस्तावित प्रकल्पावर चर्चा झाली, असे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.