Solapur, 16 September : विधानसभा निवडणुकीसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे वरिष्ठ संचालक धर्मराज काडादी यांचे नाव चर्चिली जात आहे. त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. त्यातूनच काडादी यांच्या ‘गंगा’ निवासस्थानी झालेल्या सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत समर्थकांचा दबाव मान्य करत त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी संमती दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याला काडादींचा दुजोरा मिळू शकलेला नाही
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर, तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकीनंतरच धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि महायुतीमधील भाजपकडे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून (South Solapur Constituency ) निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून धर्मराज काडादी यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर नेते मंडळीकडूनही आग्रह केला जात आहे.
सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी यांनी मात्र आपल्या स्वभावानुसार जाहीर भाष्य केलेले नाही, त्यामुळे दक्षिणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता वाढली आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना पक्षाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, उद्योजक महादेव कोगनुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, रमेश हसापुरे हे इच्छुक आहेत. मात्र, उमेदवारी कोणाला द्यावी, याचा पेच पक्षश्रेष्ठींपुढे असणार आहे. महाविकास आघाडीतील इच्छुकांपैकी सर्वाधिक संमती धर्मराज काडादी यांच्या नावावर होऊ शकते.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यामागे स्थानिकसह राज्यस्तरावरील भाजप नेत्याचा हात असल्याचा आरोप धर्मराज कडादी यांनी वारंवार केला आहे, त्यामुळे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाजपवर रोष असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपवर जनतेचा रोष व्यक्त होण्याची शक्यता आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी प्रकरणामुळे धर्मराज कडादी यांच्या विषयीची सहानुभूती मात्र वाढली आहे. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यापासून लिंगायत समाजातही भाजपबाबात नाराजीची भावना आहे.
दरम्यान, दक्षिण सोलापूरमधून धर्मराज कडादी यांची उमेदवारी पुढे आल्यास काँग्रेसचे इच्छुक आणि शिवसेनेचे अमर पाटील यांच्यापुढे मात्र मतदारसंघाची अडचण निर्माण होणार आहे, त्यामुळे काँग्रेसकडील इच्छुकांच्या भूमिकेकडेही लक्ष असणार आहे.
दुसरीकडे, भाजपचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यापुढेही धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीमुळे कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर काडादी यांची उमेवारी पुढे येऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.