
Pune, 08 August : सोलापुरातील शरणू हांडे याच्या अपहरणप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपाला आमदार रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शरणू हांडे हा कोण आहे, हेच मला माहिती नाही. मी माझ्या घरच्यांशी, मित्रांशी व्हिडिओ कॉलवर बोलत नाही. मी माझ्या बायकोशीच व्हिडिओ कॉलवर बोलत नसेल तर हा हांडे कोण लागला, त्याला आम्ही व्हिडिओ कॉल करणार आहे. मला कुठल्याही विषयात अडकविण्याचा प्रयत्न केला तरी मी कोणाला घाबरत नाही. मी सरकारच्या विरोधात बोलणार राहणार आहे, असे प्रतिआव्हान रोहित पवार यांनी दिले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन शरणू हांडे याची विचारपूस केली होती. त्यावेळी हांडे याने आमदार रोहित पवार हे व्हिडिओ कॉलवर बोलले होते, असा आरोप केला हेाता. त्यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, सरकार तुमचं आहे, त्यामुळे तुम्ही एसआयटी स्थापन करा किंवा आणखी काय करायचे, ते तुम्ही करा. माझ्या फोनवर व्हिडिओ कॉलची सुविधा नाही. मी सरकारच्या विरोधात आक्रमक पद्धतीने बोलतोय आणि रोज एका मंत्र्याला अडचणीत आणतोय. त्या दृष्टीकोनातून माझं नाव घेऊन मला अडकविण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काय दुधखुळे नाही.
आम्ही कुठेही काही चुकीचं केलेले नाही. एखाद्या कार्यकर्त्याने चूक करून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली असेल तर त्याच्यावर जी कारवाई करायची आहे, ती तुम्ही करा. जो कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतो, त्याच्या पाठीशी आम्ही नसतो. पण, अमित सुरवसे नावाच्या कार्यकर्त्याला मी आधीपासून ओळखतो, हे मी नाकारत नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत असतात. पण कुठल्या कार्यकर्त्याने चुकीचं केलं तर त्याला नेता जबाबदार नसतो. फोटो म्हणाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत, तसेच बावनकुळेंपासून इतर अनेक नेत्यांचे फोटो अनेक अशा व्यक्तींबरोबर आहेत, जे चुकीचं काम करतात. त्यामुळे त्या खोलात आम्ही जात नाही. त्यामुळे तुमचं सरकार आहे, मुख्यमंत्री, गृहमंत्री तुमचे आहेत, त्यामुळे खरं काय ते लोकांसमोर येण्यासाठी याबाबत एसआयटी स्थापन करण्यात यावी.
अमित सुरवसे आणि महादेव देवकते यांचे फोटो तुमच्यासोबत आहेत, तसेच शरद पवारांचा टॅटूसुद्धा आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो एका ड्रग्ज माफियाबरोबर आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो सट्टा खेळणाऱ्यांबरोबर आहे. फडणवीस यांचे फोटो अशा अनेक लोकांसोबत आहेत. फोटो आणि फोटोतील व्यक्तींशी जोडायचे झाले तर आम्ही रोजच असे फोटो काढू, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.
कार्यकर्ता चुकीचं काम करत असेल तर नेत्यालाच माहिती नसतं तो कार्यकर्ता कोण आहे. त्यामुळे फोटो दाखवून माझ्यावर आरोप करणार असाल तर मी भाजप नेत्यांना विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी, असे आवाहन मी त्यांना करतो. मी व्हिडिओ कॉल केला हेाता का हे लोकांसमोर येऊ द्या. पण, सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून मला अडकविण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्ही कितीही डोकं आपटा, कितीही चौकशी करा, तुम्हाला काहीही सापडणार नाही. मी सरकारच्या विरोधात लोकांच्या वतीने बोलत राहणार आहे, असे उलट आव्हानही रोहित पवारांनी दिले.
अमित सुरवसे हा मला अनेक सामाजिक कामासंदर्भात भेटला आहे. त्याने जे आज कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल तर चुकीचे आहे. पण दोन महिन्यांपूर्वी धनगर समाजाचा अमित सुरवसे याला अत्यंत निर्दयीपणे मारहाण झाली होती. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातून हे कृत त्याने केले की काय, असं मला वाटतंय, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.