

काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियान सुरू करून इचलकरंजीत पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता असून नव्या नेतृत्वाला संधी मिळू शकते.
आगामी काळात गतवैभव मिळवण्यासाठी पक्षाला संघटनात्मक बळकटी देण्याचे मोठे आव्हान आहे.
ichalkaranji news : इचलकरंजी इचलकरंजी शहरात अस्तित्वाच्या शोधात असलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी घेण्याचे वेध लागले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियान सुरु केले आहे. त्याअंतर्गत पक्षात मोठे संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. त्यानुसार इचलकरंजी शहरातही पक्षात बदल अपेक्षीत असून महत्वाच्या पदावर नव्या चेह-यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चाचपणी करण्यात येत आहे. यातून पुढील काळात पक्षाला गतवैभव मिळविण्यासाठी नव्याने पुर्नबांधणी करण्याचे आव्हान असणार आहे. यासाठी पक्षनेतृत्वाचा कस लागणार आहे.
इचलकरंजी आणि काँग्रेस पक्ष असे समिकरण एकेकाळी होते. सर्व ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. अनेक दिग्गज मंडळी या पक्षातून घडली. जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारणात मोठी झाली. त्यामुळे शहराच्या राजकारणात काँग्रेसचा दबदबा राहिला होता. विशेषतः या पक्षावर आवाडे घराण्याचा नेहमीच वरचष्मा राहिला. पण त्यांनी पक्ष सोडल्यांनतर मात्र या पक्षाच्या प्रभाव कमी झाला.
यानंतर मात्र काँग्रेस पक्षाच्या बांधणीकडे अपेक्षीत लक्ष दिले नाही. पक्षाला मानणारा वर्ग शहरात आहे. पक्षाच्या वाढीसाठी ताकदीने प्रयत्न झाले नसल्याचेच दिसून आले. केवळ पक्षाकडून आलेले कार्यक्रम राबविण्याचेच काम काही वर्षे केले आहे. अनेक वर्षे इचलकरंजी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदार संघ महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला सोडण्याची नामुष्की आली.
काँग्रेसची मजबूत फळी तयार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी झोकून देवून काम केले असते तर हा मतदार संघ काँग्रेसकडे कायम राहिला असता. त्यामुळे मतदारांवर अनेक वर्षे बिंबलेले हात चिन्ह विधानसभा निवडणुकीतून गायब झाले नसते. त्यानंतर महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला प्रभाव टिकविता आला नाही.
आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने दिलेले बहुतांशी प्रभावी उमेदवार पराभूत झाले. काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. वस्त्रनगरीच्या राजकीय पटलावर काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता या पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करण्याची संधी आहे. राष्ट्रीय पातळीवरील अभियानांतून काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहे.
इचलकरंजीत काँग्रेसची कमकुवत स्थिती-
-पक्षाचा कमी प्रभावाचा गत विधानसभा निवडणुकीत फटका
-विधानसभेला मित्र पक्षाला जागा सोडण्याची नामुष्की
-गत विधानसभा निवडणुकीतून हात चिन्ह गायब
-महापालिका निवडणुकीतही प्रभावी उमेदवार पराभूत
-तळागाळात पोहचून पक्षाची बांधणी करण्याचे आव्हान
काँग्रेसला भविष्यात या आहेत संधी-
-प्रस्थापितांऐवजी नव्या चेह-यांना संधी शक्य
-पुन्हा पक्ष बांधणीला नव्याने बळ मिळण्यास होणार मदत
-सध्या कोणत्या निवडणूक नसल्याने पक्ष बांधणीसाठी पुरेसा वेळ
-पक्षाला गतवैभव मिळवून देण्याची ही संधी
-सक्षम बांधणी केल्यास विधानसभेवर `हात` चिन्हावर हक्क सांगता येणार
निरिक्षक गुरुवारी इचलकरंजीत
पक्षाच्या संघटन सृजन अभियानासाठी जयशंकर पाठक गुरुवारी (ता.१६) सांयकाळी पाच वाजता शहर काँग्रेस कमिटीत येणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांची व्यक्तीगत भेट घेवून पक्ष बळकटीसाठी त्यांच्या भावना समजून घेणार आहेत. त्यांच्यासोबत समन्वयक सचिन सावंत, राहूल गायकवाड, नंदकुमार कुंभार उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी दिली.
1. काँग्रेसने कोणते अभियान सुरू केले आहे?
अखिल भारतीय काँग्रेसने संघटन सृजन अभियान सुरू केले आहे.
2. इचलकरंजीत काय बदल अपेक्षित आहेत?
पक्षात नेतृत्व बदल आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
3. या अभियानाचा उद्देश काय आहे?
पक्षाची पुर्नबांधणी करून पूर्वीचे बळकटीकरण करणे हा उद्देश आहे.
4. काँग्रेसला कोणते आव्हान आहे?
गतवैभव मिळवण्यासाठी मजबूत संघटन उभे करण्याचे मोठे आव्हान आहे.
5. या बदलांचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
स्थानिक राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.