

लोकसभा व विधानसभा निवडणुकांत सुळकुड पाणी प्रश्नावर मोठ्या प्रमाणात आश्वासने देण्यात आली होती.
निवडणुका संपल्यानंतर हा मुद्दा प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून दूरच राहिला.
आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सुळकुड पाणी प्रश्न राजकीय चर्चेत आला आहे.
ichalkaranji News : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी आश्वासन दाखवून इचलकरंजीतीन मताधिक्य मिळवले. शहरवासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न समजल्या जाणाऱ्या सुळकुड पाणी प्रश्न विषय संदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांनीही छातीठोकपणे या निवडणुकीत वल्गना केल्या. मात्र निवडणूक संपतात हा विषय संपला की काय? असेच चित्र येथे असून तो पूर्णत्वाला नेण्याचा मुद्दाच गायब झाला आहे. गेली वर्षभरात केवळ पाणी प्रश्नाचा पाठपुरावा सुरू असल्याचे दाखवण्यात आले. मात्र या प्रश्नाचा राजकीय तवंग केवळ हवेतच तरंगत आला आहे.
आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शहरवासीयांना पाण्याचे गाजर दाखवले. इचलकरंजी वासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुळकुड असला तरी राजकीय फायद्यासाठी हा मुद्दा कोणाला फायदेशीर ठरला? शिवाय तो अजून किती फायद्याचा ठरवणार? अशी विचारण्याची वेळ आता आली आहे.
इचलकरंजी वासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी वारणा योजना मंजूर झाली. मात्र वाढता विरोध झाल्यानंतर वारणा योजनेला पर्याय म्हणून दूधगंगा योजना म्हणजेच सुळकुड योजना मंजूर झाली. मात्र यालाही कागलमधील जनतेचा विरोध झाल्यानंतर आज ही इचलकरंजी वासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर कार्यक्रमात इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी घोषणा केली असली तरी केवळ आणखी किती दिवस आस लावून धरायची ही वेळ इचलकरंजी वासियांवर आली आहे.
इचलकरंजीचे राजकारण नेहमीच सुळकुड योजनेभोवती फिरत राहिले. लोकसभा, विधानसभा निवडणूक असेल प्रत्येकवेळी पाणी योजनेचा मुद्दा चर्चेत आला. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक वलग्ना झाल्या, आश्वासने दिली गेली. पण निवडणुका संपल्या की सोयीस्कर रित्या हा मुद्दा बाजूला पडत आहे. गेली दोन दशके हाच प्रकार सुरू असल्याने काही नेत्यांचा राजकीय फायदा देखील झाला आहे. काहींना धक्का देखील बसला आहे. अशातच आता इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधींना विरोधक या मुद्द्यावर घेरण्याची शक्यता आहे.
महाविकास आणि नंतरच्या महायुती सरकारच्या काळात सुळकूडच्या पाणी प्रश्नावरून इचलकरंजीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत समरजीत घाटगे यांनी देखील सुळकुडच्या पाणी प्रकल्पावरून इचलकरंजीला पाणी देण्याला विरोध दर्शवला होता. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी देखील मंत्री मुश्रीफ यांना खुले आव्हान दिले होते. त्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. पालकमंत्री मुश्रीफ असताना रक्तपाताची भाषा या प्रकल्पावरून झाली होती. मात्र ठाकरे आणि शिंदे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पावर कोणताच मार्ग निघाला नाही.
मुख्यमंत्र्याकडे गाऱ्हाणे
इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली सुळकुड योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना राज्य सरकारने मंजूर केली होती. मात्र वाढत्या विरोधामुळे ही योजना रेंगाळी. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनाचा औचित्य साधून आमदार राहुल आवाडे यांनी ही मागणी केली होती . इचलकरंजी शहर वस्त्र नगरी असल्यामुळे वाढते शहरीकरण औद्योगीकरण लक्षात घेता ही योजने लवकर मार्गी लावावी अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली होती. तर फडणवीस यांनी योजने संदर्भात बैठक घ्यावी अशी देखील मागणी त्यांनी केली होती.
चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
साधारण तीन ते चार महिन्यापूर्वी फडणवीस इचलकरंजी दौऱ्यावर आले होते. यावेळी जवळपास 700 कोटीहून अधिक विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले होते. या दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी इचलकरंजीवासीयांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले होते.
आता तोंडावर पाणी मारून पाने पुसली
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने आश्वासन दिले. त्यावेळी इचलकरंजीकरांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आले. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा दौरे केले. त्यावेळीही आश्वासन दिली होती. आता नुकताच पुन्हा एकदा ते इचलकरंजीमध्ये येऊन गेले. यावेळी देखील त्यांनी इचलकरंजीवासी यांच्या तोंडावर पाणी मारून पान पुसली, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे नेते मदन कारंडे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली आहे.
1. सुळकुड पाणी प्रश्न नेमका काय आहे?
➡️ इचलकरंजी शहरासाठी सुळकुड येथून पाणीपुरवठा करण्याचा दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प आहे.
2. हा मुद्दा पुन्हा चर्चेत का आला आहे?
➡️ आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी पुन्हा आश्वासने दिल्यामुळे.
3. यापूर्वी कोणत्या निवडणुकांत हा मुद्दा मांडला गेला होता?
➡️ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधकांनी हा मुद्दा प्रमुखपणे मांडला होता.
4. सुळकुड प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम झाले आहे का?
➡️ प्रत्यक्ष प्रगती अत्यंत मर्यादित असून नागरिकांमध्ये नाराजी आहे.
5. शहरवासीयांची सध्या मुख्य मागणी काय आहे?
➡️ राजकीय आश्वासनांऐवजी सुळकुड पाणी योजनेची ठोस अंमलबजावणी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.