

Solapur, 04 January (आप्पासाहेब हत्ताळे) : 'घाऊक इनकमिंग'मुळे जिल्ह्यातील नगरपालिका आणि सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात अन्याय झाल्याची भावना भाजपच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील अन्य पक्षांतील नेत्यांचा प्रवेश आणि प्रवेशासाठी 'वेटिंग'वर असलेले नेते यामुळे बाहेरून आलेल्यांनाच संधी मिळण्याच्या शक्यतेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
नगरपालिका निवडणुकीत भाजपने (BJP) निष्ठावंत कार्यकर्त्यांऐवजी अन्य पक्षांमधून आलेल्यांना संधी दिली गेली. पंढरपूर-मंगळवेढ्यातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनाही जुमानले नाही. परिणामी अपेक्षित नगराध्यक्ष निवडून न आल्याने पक्षाला मोठा फटका बसल्याचे दिसून येते. मात्र, सर्वाधिक नगरसवेकपदाच्या जागा जिंकल्या, यात नेते समाधान मानत आहेत.
सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात 'इनकमिंग' घडवून आणत त्यांना उमेदवारी दिल्याने जुने व निष्ठावंत कार्यकर्ते 'वंचित' राहिले आहेत. या दोन्ही निवडणुकांतील पक्षाच्या भूमिकेने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहण्याच्या भीतीने इच्छुक पदाधिकारी-कार्यकर्ते धास्तावले आहेत.
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर व त्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही प्रवेशासाठी 'वेटिंग'वर आहेत. तर निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष भाजपकडून लढू इच्छिणाऱ्यांचा प्रवेश होऊ शकतो. कारण महापालिका निवडणुकीत निवडणूक कार्यालयातच अन्य पक्षातील नेत्याला उमेदवारी देण्याचा विक्रमही भाजपने केला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत पक्षात अघटित घडू शकते, ही भाजपच्या निष्ठावंतांची भावना झाली आहे.
अन्य पक्षांमधून आलेल्या धनदांडग्यांसमोर पक्षाच्या फाटक्या कार्यकर्त्याचा निभाव लागणार नाही. पक्षाचा आता जिंकून येण्याच्या एकमेव निकषात आयात नेत्यांशी आपण स्पर्धा करू शकणार नाही, अशी भीती भाजपचे निष्ठावंत व्यक्त करीत आहेत.
निष्ठावंतांना उमेदवारीची शाश्वती मिळेना
मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील, दक्षिण सोलापूरमध्ये माजी आमदार दिलीप माने, माढ्यात विक्रमसिंह शिंदे, रणजितसिंह शिंदे, माळशिरसमध्ये बाबाराजे देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने देशमुख या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नुकतेच जकराया शुगरचे सचिन जाधव यांचा भाजप प्रवेश झाला आहे. माळशिरसमध्ये बांगार्डेचे सरपंच सुनील दडस यांच्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत.
सांगोल्यात माजी आमदार दीपक साळुंके, करमाळ्यात दिग्विजय बागल, माढ्यात शिवाजी सावंत हे भाजप प्रवेशासाठी 'वेटिंग'वर आहेत. पक्षातील 'इनकमिंग'मुळे आपल्याला उमेदवारी मिळण्याची शाश्वती नसल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक भाजपचे निष्ठावंत सांगू लागले आहेत.
आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का?
'घाऊक इनकमिंग'मुळे पक्ष मोठा झाला आहे. नगरपालिका निवडणुकीत गतवेळेपेक्षा जास्त जागा जिंकल्याचे भाजप नेते आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात निश्चितच तथ्य आहे. मात्र, जनतेने ज्यांना नाकारले अशा डागळलेल्या प्रतिमेच्या नेत्यांना पक्षात घेतले, आजपर्यंतच्या पक्षाच्या प्रवासात योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना नाकारून त्यांच्या समर्थकांना उमेदवारी दिली, तर आमचं काय, आम्ही सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल निष्ठावंत करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.