
Shiv Sena News Kolhapur : राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये खरी स्पर्धा लागली आहे. या पक्षांमधील काहीजण नाराज झाले आहेत, तर काही खंत व्यक्त करून आपल्याला न मिळालेल्या मंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले आहेत. महायुतीची एकजूट ही राज्यात दाखवली जात असताना, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र आपसात नाराजी अद्याप कायम असल्याचं दिसत आहे.
महाविकास आघाडीमधील(MVA) अंतर्गत वाद चव्हाट्या येत असताना, आता कोल्हापुरात महायुतीत देखील अंतर्गत खदखद मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्माण झाली आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्री पद न मिळाल्याने भाजप आणि राष्ट्रवादीतच नव्हे तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये देखील अंतर्गत विरोध आता नजरेसमोर दिसत आहे. शिवाय प्रकल्पाला एका आमदारांचे समर्थन आणि दुसऱ्या आमदारांचा विरोध हेच चित्र दिसत आहे. तर एका आमदाराला मंत्रीपद मिळाले आणि दुसऱ्या आमदाराला डावलले यावरूनच नाराजीनाट्य अद्याप दिसत आहे.
कोल्हापुरातील शिवसेनेला(Shivsena) मंत्रिमंडळात एक जागा उपलब्ध झाल्यानंतर या मंत्रिपदावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या दावा केला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश अबिटकर यांना संधी दिली. यामुळे आमदार क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर पालकमंत्री म्हणून अबिटकर यांची नियुक्ती झाल्यानंतर खंतही व्यक्त केली.
पालकमंत्री आबिटकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा विरोध पाहता शक्तीपीठ महामार्ग करण्याला विरोध केला होता आणि आतीही त्यांची भूमिका तीच आहे मात्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर(Rajesh Kshirsagar) यांनी शक्तिपीठ महामार्गाची समर्थन केले आहे. इतकेच नव्हे तर अबिटकर यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील सहभाग अल्प प्रमाणात दिसून आला.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुरुवातीपासूनच कोल्हापूर शहराची हद्द वाढ व्हावी, या मागणीला जोर धरला आहे. अलीकडच्या काळात हद्द वाढ वरून कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. अशातच आमदार क्षीरसागर यांनी राज्य सरकार हद्द वाढीसाठी सकारात्मक आहे. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. असे स्पष्टीकरण दिले आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचेच आमदार चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध केला आहे. विधानसभा मतदारसंघातील काही गावांचा समावेश असल्याने यांनी उघड भूमिका घेत प्राधिकरण मजबूत करण्याचा सल्ला थेट सरकारला दिला आहे. मात्र नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याने त्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
एकंदरीतच चित्र पाहता विधानसभा निवडणुकीपूर्वी गळ्यात गळे घालून निवडणुकीला सामोरे गेलेले शिंदेंचे शिलेदार शहराच्या प्रमुख प्रश्नावरच एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. त्यामुळे केवळ महायुतीमध्येच नव्हे, तर शिंदेंच्या शिवसेनेत देखील अंतर्गत खदखद या निमित्ताने समोर येत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.