

Satara, 27 September : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घोषित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची शहरातील एका अलिशान हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी पुढाकार घेतला होता. या बैठकीत बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून लढायची की स्वतंत्रपणे? यावर खलबतं झाल्याची माहिती आहे. पहिल्याच दिवशी जिल्हा बॅंकेसाठी अर्ज भरणारे खासदार उदयनराजे भोसले यांना वगळून ही बैठक झाली आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रणनीती ठरविण्यासाठी बैठक झाली.
या भाजप स्वतंत्र पॅनेल करून लढल्यास काय होईल, यावर चर्चा झाली. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी स्ट्रॅटेजी आखणारे मंत्री जयकुमार गोरे यांनीच या बैठकीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महायुती होणार की भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार याची उत्सुकता आहे.
जयकुमार गोरे यांनी गेल्या महिन्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही महायुतीबाबत चाचपणी सुरू होती. गोरे वगळता इतर कोणत्याही नेत्याने स्वबळाची भाषा केली नव्हती, त्यामुळे सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता होता.
दरम्यान, मतदानाची तारीख जाहीर होताच भाजप नेत्यांनी बैठक बोलावली. या बैठकीत भाजपने स्वबळाची चाचपणी केल्याचे मानले जात आहे. पण भाजपकडून अजूनही अधिकृतरित्या स्वबळवर लढण्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बॅंकेत महायुतीचा प्रयोग होणर की नाही, याची उत्सुकता आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीला पहिल्याच दिवशी अर्ज भरणारे खासदार उदयनराजे भोसले यांची गैरहजेरी होती. त्यामुळे त्यांना डावलून भाजपने ही बैठक घेतली का? अशी चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे. पण, उदयनराजेंच्या निकटवर्तीयांनी मात्र ते पुण्याला असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगितले.
भाजपच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः मंत्री मकरंद आबा पाटील आणि शिवसेनेचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई यांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.