

Patan, 03 February : पाटण तालुक्यात शासकीय यंत्रणा विकास कामांसाठी की लोकांना त्रास देण्यासाठी आहे? असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. आता भाजपचे छत बच्चूदादांच्या डोक्यावर आहे, त्या सावलीत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. त्यामुळे सगळा सासूरवास संपविण्याची जबाबदारी आता आमची आहे,’ असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता लगावला.
पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना गोरे यांनी देसाई यांच्यावर हल्लाबोल केला. या वेळी आमदार डॉ. अतुल भोसले, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष भरत पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, माजी सभापती उज्ज्वला जाधव उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, लोकप्रतिनिधींनी पक्ष, पार्टीच्या पलीकडे जाऊन जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे; परंतु इथे ते होताना दिसत नाही. जनतेला दुःखामध्ये लोटणारी शक्ती तयार झाली आहे; पण आता यापुढे भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना त्रास देण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.
ग्रामीण भागातील सगळ्या संस्था ह्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचे कारण नाही. गावखेड्याला जे-जे लागतं, ते ग्रामविकास खात्यातून मिळतं, त्यामुळे कुणी त्रास देण्याचं कारण नाही, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
आम्ही दबावाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार नाही. मी कुणाला त्रास देण्यासाठी किंवा चॅलेंज करण्यासाठी नव्हे, तर भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी इथे आलो आहे. सातारा जिल्हा परिषदेत आमची सत्ता आल्यात जमा आहे. स्वतःच्या ताकदीवरच सत्ता आणू, असा विश्वास जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवला.
पाटण तालुक्याला सर्वाधिक निधी दिला आहे, त्यामुळे या निवडणुकीत जनतेने त्याची पोच द्यावी. या भागातील भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. सर्व ताकद आम्ही देऊ, असे डॉ. अतुल भोसले यांनी म्हटले आहे.
भरत पाटील म्हणाले, या मतदारसंघातून आठ वर्षांपूर्वी जे निवडून गेले ते परत इकडे फारसे फिरकले नाहीत. आपले सर्व उमेदवार अभ्यासू, कर्तबगार व उच्चशिक्षित आहेत. त्यांना निवडून द्या. ते तुमचे प्रश्न तळमळीने सोडवतील.
बार वाढले, शाळा बंद झाल्या
पाटण तालुक्यात दबावाचे राजकारण सुरू आहे. बिअर बारची संख्या वाढली; परंतु ३८ शाळा बंद झाल्या. समाजाला कुठे घेऊन हे निघालेत ते बघा, असा टोला सत्यजितसिंह पाटणकर यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.