
Sangli News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मिरजेतही राजकीय वातावरण सध्या तापलेलं असून भाजपबरोबर महायुतीतील सर्वच पक्षांना सुगीचे दिवस आले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षातही प्रवेश झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे समित कदम यांनीच भाजपमधून हे पक्षप्रवेश घडवून आणले आहेत.
समित कदम हे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी ते फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. वर्षभरापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समित कदम यांच्यावर फडणवीस यांचा दूत म्हणून आरोप केले होते. कदम यांचेही सोशल मिडीयावर नियमितपणे फडणवीस यांच्या भेटीचे फोटो बघायला मिळतात. याच कदम यांनी अंतर्गत वादातून भाजपलाच दणका दिला आहे.
भाजप आणि जनसुराज्य हे दोन्ही पक्ष युतीमध्येच आहेत. मात्र मिरजमध्ये आमदार तथा माजी पालकमंत्री सुरेश खाडे आणि समित कदम यांच्यात विधानसभेच्या आधी काहीच अलबेल नव्हते. याचाच परिणाम म्हणून काही दिवसांपूर्वी भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आनंदा देव माने यांनी समित कदम यांचे नेतृत्वात जनसुराज्य शक्तीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक महादेव कुरणे यांचा देखील गट गेला. यामुळे सध्या मिरज महानगरपालिका अंतर्गत भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
मिरज तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 आणि पंचायत समितीमध्ये 22 सदस्य भाजपचे आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमधील सदस्यांची संख्या लक्षात घेतल्यास भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. मिरज तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी यापूर्वी नव्याने प्रभाग रचना झाली असून आता सरपंच पदाचेही आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे स्थानिकच्या पार्श्वभूमीवर येथे अनेकजण शड्डू ठोकून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.