

जनसुराज्य शक्ती पक्षाने महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये किंगमेकरची भूमिका निभावली आहे.
मात्र पन्हाळा आणि हातकलंगले या बालेकिल्ल्यात जागा कमी झाल्याने पक्षाला मोठा फटका बसला.
आगामी राजकारणात ही घट जनसुराज्य शक्तीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Kolhapur News : राहुल गडकर
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या जनसुराज्य शक्ती हा पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत राहिला. एक जागा निवडून आली असली तरी पहिल्याच प्रयत्नात उपमहापौर मिळवले. या पाठोपाठ गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील किंगमेकर ची भूमिका निभावत वारंवार जिल्हा परिषदेमध्ये पदे भोगले आहेत. मात्र पन्हाळा आणि हातकलंगले या बालेकिल्ल्यातच जनसुराज्य शक्तीला मतदारांना गृहीत धरण्याचा फटका बसला आहे. मागील सभागृहात सहा पदे घेतलेला जनसुराज्य शक्ती पक्ष यंदाच्या निवडणुकीत केवळ पाच जागांवर राहिला. शाहूवाडी तालुक्यातील जनतेने आब राखली असली तरी आगामी राजकारणात जनसुराज्य शक्तीला धोक्याची घंटा मानली जाते.
जिल्हा परिषदेच्या राजकारणात नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे बालेकिल्ले यावेळच्या निवडणुकीत मात्र ढासळले. पक्षाच्या स्थापनेपासून जिल्हा परिषदेत सत्ता कुणाचीही असली तरी त्यांना या पक्षाच्या कुबड्या घ्याव्याच लागत होत्या. त्यातून उपाध्यक्षपद, महत्त्वाची सभापतिपदे या पक्षाच्या सदस्यांना मिळाली आहेत; पण यावेळची निवडणूक त्याला अपवाद ठरली आहे.
मावळत्या सभागृहात पन्हाळ्यातून 'जनसुराज्य' चे तीन सदस्य विजयी झाले होते, यावेळी केवळ एकच जागा या पक्षाला मिळाली. शाहूवाडीत या पक्षाला अपेक्षेप्रमाणे दोन जागांवर यश मिळाले; पण पंचायत समितीत पुन्हा समान संधी राहणार आहे. हातकणंगले तालुक्यातून मावळत्या सभागृहात 'जनसुराज्य'चे दोन सदस्य होते. यावेळी या मतदारसंघाचा आमदार 'जनसुराज्य'चा असूनही केवळ एकच जागा मिळाली.
आमदार अशोकराव माने यांना शिरोळमध्ये त्यांच्या पीएचा पराभवही वाचवता आला नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत केवळ घराणे शाही आणि आपला माणूस उभा करण्याची धडपड आमदार माने यांची राहिली आहे. त्याचाच फटका बसला असून जनतेने त्याच कारणावरून नाकारल्याची चित्र हातकणंगले मध्ये आहे. पन्हाळ्यातील कमी झालेले वर्चस्व डॉ. कोरे यांच्यादृष्टीने भविष्यातील राजकारणात अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या स्थापनेपासून बालेकिल्ला मानल्या गेलेल्या पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाला यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. जिल्हाभरात जनसुराज्यचे सहा उमेदवार निवडून आले असले, तरी पक्षाचा जन्म आणि राजकीय पायाभरणी ज्या पन्हाळा तालुक्यात झाली, त्याच 'होम पीच'वर जनसुराज्यचा सपाटून पराभव झाला. अपवाद वगळता तब्बल पंचवीस वर्षांची पंचायत समितीवरील सत्ता यावेळी संपुष्टात आली.
शिवसेना (शिंदे) पक्षानेही तालुक्यात ताकद दाखवत एका जिल्हा परिषद गटात व चार पंचायत समिती गणांत विजय मिळवला. जनसुराज्य शक्ती पक्षाला केवळ एका जिल्हा परिषद गटात व चार पंचायत समिती गणांत समाधान मानावे लागले. पन्हाळा तालुक्यातील हा पराभव जनसुराज्य शक्ती पक्षासाठी केवळ आकड्यांचा नसून, तो राजकीय संदेश देणारा आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसने अचूक टायमिंग साधत आणि योग्य उमेदवारांची निवड करत तालुक्यात जोरदार मुसंडी मारली. तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी तीन गटांत तर पंचायत समितीच्या बारा गणांपैकी तीन गणांत राष्ट्रवादीने विजय मिळवत पंचायत समितीत आपले खाते उघडले. त्यामुळे जनसुराज्यच्या वर्चस्वाला थेट आव्हान देणारा हा निकाल ठरला आहे.
माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सरूड व मानसिंग गायकवाड यांनी बांबवडे हे आपआपले गट भक्कमपणे राखले असले तरी विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला मतदारांनी तालुक्यात मोठे पाठबळ दिले असल्याचे स्पष्ट होते. आमदार कोरे व कर्णसिंह गायकवाड आघाडीला हा निकाल अधिक उभारी देणारा, तर पाटील गायकवाड आघाडीला धोक्याचा इशारा देणारा ठरला आहे. आंबर्डे गटातही पाटील-गायकवाड यांचीच हुकमत चालायची.
२०१२ च्या निवडणुकीत माजी आमदार पाटील यांनी योगिराज गायकवाड यांच्या गळ्यात विजयाची माळ घालत ही हुकमत तालुक्याला दाखवून दिली होती. मात्र, यावेळचे चित्र फारच वेगळे आहे. आंबर्डे गट व त्या अंतर्गतच्या दोन्ही गणात जनसुराज्याने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. पाटील-गायकवाड आघाडीने आपले होमपिच अबाधित ठेवले असले तरी कोरे-गायकवाड आघाडीच्या उमेदवारांच्या एकूण मतांची आकडेवारी पाहता ती पाटील- गायकवाड आघाडीला मोठा धक्का देणारी आहे.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत हातकणंगले तालुक्यात महायुतीने बाजी मारली असली तरीही जनसुराज्यला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय विद्यमान आमदार अशोकराव माने यांना धक्का बसला आहे. आमदार विनय कोरे यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले जनसुराज्यचे आमदार डॉ. अशोकराव माने यांचेही या निवडणुकीकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणूकीत महायुतीतील आवाडे, महाडिक, माने घराण्याने आपापल्या जागा राखत महायुतीचा झेंडा रोवला आहे. जिल्हा परिषदेच्या ११ जागांमध्ये भाजपने ५ तर शिंदेसेनेने ३ जागा मिळवल्या आहेत, तर पंचायत समितीच्या २२ जागांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने ११ जागी तर शिदसेनेने ५ जागी विजय मिळवल्या. आमदार अशोकराव माने यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, जनसुराज्यच्या पट्यातही काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे, तर रूई जिल्हा परिषद मतदारसंघातूनही त्यांच्या स्विय सहाय्यक सुहास राजमाने यांचा पराभव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
1. जनसुराज्य शक्ती पक्ष किंगमेकर का मानला जातो?
कारण कमी जागा असूनही सत्तास्थापनेत निर्णायक भूमिका बजावतो.
2. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काय बदल झाला?
मागील वेळेपेक्षा एका जागेची घट झाली आहे.
3. कोणत्या भागात जनसुराज्य शक्तीला फटका बसला?
पन्हाळा आणि हातकलंगले या पारंपरिक बालेकिल्ल्यात.
4. शाहूवाडी तालुक्यात पक्षाची स्थिती कशी आहे?
शाहूवाडीत जनतेने पक्षाची आब राखली आहे.
5. या निकालाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो?
पक्षाला आगामी निवडणुकांत रणनीती बदलावी लागण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.