
- बादल सर्जे
आमदार गोपीचंद पडळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पूर्वीपासूनच विळ्या-भोपळ्याचं वैर. पडळकर यांच्या टोकाच्या टीकांमधून अनेकदा हे वैर जाहीररित्या दिसून येते. अशात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या आदेश दिले आहेत. त्यामुळे पडळकर आमदार असलेल्या आणि अजित पवार यांनी माजी आमदारांना घेऊन ताकद वाढवलेल्या जत शहरात हे वैर पुन्हा एकदा दिसून येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील अखेरचं शहर म्हणून जतला राजकीय महत्व आहे. जत शहर आणि तालुक्यात काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे, भाजप नेते आणि राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार विलासकाका जगताप यांची ताकद आहे. पण यंदा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने यंदा इथल्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष पहायला मिळणार आहे.
गतवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. निकालात काँग्रेसला नगराध्यक्षसह 7, राष्ट्रवादीला 6 आणि भाजपला 7 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवले होते. त्यावेळी नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण पडल्याने सलग पाच वर्षे शुभांगी बन्नेनवर या नगराध्यक्ष होत्या.
डिसेंबर 2022 ला नगरपरिषदेची मुदत संपली. पण ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने शहरातील इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. इच्छुकांची यादी तयार करण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या आहेत. नेत्यांकडूनही कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पुढील रणनीती काय असावी, यावर चर्चा झडत आहेत.
जत शहरात अनेक वर्षे विक्रम सावंत आणि सुरेश शिंदे यांचे वर्चस्व राहिले आहे. पण गत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी शहरात मोठ्या प्रमाणात मते मिळविली आहेत. त्यामुळे काँग्रेसला यंदाची नगरपरिषदची ही निवडणूक नक्कीच अवघड असणार आहे. योग्य उमेदवार निवडीपासून ते प्रचार यंत्रणेपर्यंतचे ताकदीने नियोजन करावे लागणार आहे. शहरातील विस्कटलेली घडी बसवावी लागणार आहे. विक्रम सावंत, बाजार समिती सभापती सुजय शिंदे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग यांना पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शहरात मिळालेली मते टिकवून ठेवणे, योग्य नियोजन करणे हे भाजपपुढील प्रमुख आव्हान असणार आहे. पडळकर यांनी सध्या तरी तालुक्यातील विकासाला प्राधान्य देत थेट जनतेशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत. जत शहरासाठी 78 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम आहे. यामुळे त्यांना गत विधानसभेला जतमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. हे वाढीव मताधिक्य भाजपसाठी जमेची बाजू ठरणार आहे. शिवाय जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, रिपाइंचे नेते संजय कांबळे, जनसुराज्यचे बसवराज पाटील, प्रहारचे सुनील बागडे यांच्यासह इतर नेत्यांची साथ घ्यावी लागणार आहे.
अजित पवार यांची वाढलेली ताकद कोणाची डोकेदुखी ठरणार हा सध्या शहरातील राजकीय चर्चेचा मुख्य विषय आहे. गोपीचंद पडळकर यांचे कट्टर विरोधक असणारे माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश पडळकर यांना शह देण्याचा घाट असल्याची सध्या भागात चर्चा आहे. सध्यातरी त्यांनी वेट अॅन्ड ऑचची भूमिका घेतली आहे. पण येणाऱ्या काळात त्यांची काय रणनीती काय असणार हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.