
Ratnagiri News : भाजपने नुकताच राज्यातील 58 जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केलीय. यात दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाचीही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेत दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा राजेश सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर उत्तरसाठी सतीश मोरे यांच्या रूपाने नवीन चेहरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय शिलेदार म्हणून ओळखले जातात.
लोकसभा, कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले होते. या यशात राजेश सावंत आणि सतीश मोरे यांनी मोठे योगदान दिले आहे. यामुळेच या दोघांनाही संधी मिळाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर या दोघांच्या निवडीमुळे रत्नागिरीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय.
निवड झाल्यानंतर सावंत यांनी सांगितले की, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या सर्व निवडणुकांत कार्यकर्त्यांना विजयी करण्याची व भाजप प्रदेशाकडून येणाऱ्या कार्यक्रमांची आखणी, नियोजन करून यश मिळवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्यामुळे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. सर्वांना सोबत घेऊन भाजपाची ताकद वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या पदाचा मी वापर करेन.
सावंत हे गेल्या आठ वर्षांपासून भाजपचे संघटनात्मक काम करत आहेत. त्यांनी जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केले असून, गेले दीड वर्ष ते जिल्हाध्यक्ष होते. यापूर्वी त्यांनी राजकीय जीवनात तालुकाध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष अशी पदे अन्य पक्षामध्ये भूषवली आहेत. त्यामुळे ते संघटनात्मक जबाबदारी चांगल्याप्रकारे निभावतात. यामुळेच त्यांना पुन्हा ही संधी मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
भाजपने उत्तरसाठी सतीश मोरे यांच्या रूपाने नवीन चेहरा दिला असला तरी ते नवखे नाहीत. त्यांच्या निवडीने उत्तर रत्नागिरीत समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. ते याआधी चिपळून मंडल तालुकाध्यक्ष होते. त्यांचे येथील उत्तम काम बघनच त्यांना पक्षाने प्रमोशन दिले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्याच अनुशंगाने सर्वच राजकीय पक्ष रिक्त असणारी पदं भरत आहे. पण यात भाजपने आघाडी घेतली असून याची सुरूवात मंडल अध्यक्षांच्या निवडीपासून झाली आहे. आता जिल्हाध्यक्षांच्या निवडीही झाल्या असून राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षही बदलण्यात येणार आहेत. अशातच शिवसेनेसह (ठाकरे) इतर पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग वाढले असून पक्षाची ताकद वाढत आहे. मात्र आयारामांकडे आता लक्ष न देता भाजपने जुन्याच नेतृत्वाला बळ देण्याचे काम केलं आहे.
राजेश सामंत यांचा राजकीय प्रवास हा राष्ट्रवादी, शिवसेना होत भाजपपर्यंत आला आहे. ते त्याच्याआधी शिवसेनेत होते. तर त्यांचा हातखंडा कार्यकर्ता जोडण्यात आहे. यामुळे याचा फायदा आतापर्यंत मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांना होत होता. कधीकाळी ते किरण सामंत यांचे जवळचे मानले जात. तर ते नाराजांची नाराजी दूर करत. आता तर पुन्हा एकदा त्यांची जिल्ह्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने ते सामंत बंधुंच्या नाराजांना एकत्र करू शकतात. तसेच निधी आणून आपले राजकीय वजनही वाढवू शकतात. यामुळे आगामी स्थानिकमध्ये विभक्त सलढण्याची वेळ आल्यास सामंत बंधुंना सावंत यांचा सामना करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.