Gore Vs Andhare : 19 गुन्हे दाखल असूनही हा माणूस मंत्री झालाय...गोरेंचा दुसरा एपिसोड मी लवकरच ओपन करेन : अंधारेंनी कुंडलीच मांडली

Sushma Andhare's Allegations : सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधातील कथित गुन्ह्यांचा उल्लेख केला. गोरे भाजपमध्ये का दाखल झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Jaykumar Gore-Sushma Andhar
Jaykumar Gore-Sushma AndharSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 August : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज (ता. ०९ ऑगस्ट) पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर हल्लाबोल केला. ‘गोरे कोण आहेत, हे मला चांगलंच माहिती आहे. त्यांच्यावर साधारणतः 19 गुन्हे दाखल आहे. विशेष म्हणजे 19 गुन्हे दाखल असतानाही हा माणूस मंत्री झाला आहे. एखाद्यावर 4 ते 5 गुन्हे दाखल झाले, तर त्याच्यावर मोक्का दाखल होतो. कदाचित दाखल झालेले गुन्हे पाहता मोक्काची कारवाई झाली असती म्हणून गोरे भाजपमध्ये दाखल झाले आहेत का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.

अंधारे ह्या गेल्या दोन दिवसांपासून सोलापुरात असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री गोरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणणाऱ्यांनी राम मंदिरातील पैशाची चोरी केली, त्यासंदर्भात राम रक्षा आंदोलन सुरु आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कारण नसताना काही विधाने केली. त्यामुळे ‘बालकमंत्री’ गोरे यांना त्याच भाषेत बोलण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला.

जयकुमार गोरे यांचा व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे म्हणाल्या, गोरे कोण आहेत, हे मला चांगलंच माहिती आहे. एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले; म्हणून त्यांच्यावर कम्प्लेंट दाखल करण्यात आली. मी जेव्हा त्यावर बोलले, तेव्हा त्यांच्यावर दबाव आणला गेला. संबंधित महिला पैसे घेताना कोठेही दिसत नाही. पण गोरेंकडे 1 कोटी रुपये कुठून आले, असे कोर्टाने म्हटलं आहे. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं

सुषमा अंधारे म्हणाल्या, मृत व्यक्तीला जिवंत दाखवत एका दलित माणसाची जागा नावावर करून घेतली, त्यांच्यावर 6 मार्च 2025 रोजी ऍट्रॉसिटी दाखल झाली आहे. तसेच, 8 मे 2026 रोजी ‘नॉन बेलेबल वॉरंट’ जाहीर झालाय, हे समन्स रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या सगळ्यावर गोरे कधी बोलणार आहेत का?

मी खूप जुने बोलतच नाही. मंत्री असणाऱ्या माणसावर जे डाग आहेत, त्यावर बोला. पावाचा तुकडा खाऊन भुंकणाऱ्यांनी यावर बोलावं. भाजपच्या जुन्या माणसांना भाजप संधी देत नाही. मात्र, काँग्रेसमधून आलेल्या माणसाला मंत्री केलं, असा आरोप अंधारे यांनी केला.

Jaykumar Gore-Sushma Andhar
Beed News : ठाकरेंच्या नेत्यांचा सुनेत्रा पवारांना सल्ला : बीडबाबत निर्णय घेताना सुनील तटकरेंना बाजूला ठेवा; कारण ते ‘कटकरें’च्या भूमिकेत...

दहिवडी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. (सुषमा अंधारे यांनी कलम वाचून दाखवली) त्यावर गोरे यांना उत्तर द्यायची असतील, तर गोरेंसाठी मी दुसरा एपिसोड लवकरच ओपन करेन....मिरज पोलिस ठाण्यातही 420 चा गुन्हा दाखल झाला आहे. इस्लामपूरमध्येही गुन्हा दाखल आहे, काय कीर्ती आहे गोरेंची, मीठ मोहोरीने दृष्ट काढावी. मी गोरेंना ओळखते, मी त्यांची कुंडली वाचतेय, असेही अंधारे यांनी नमूद केले.

त्या म्हणाल्या, १९ गुन्हे दाखल असलेल्या माणसाला मंत्री म्हणून घ्यावं लागलं, यात फडणवीस यांची काय मजबुरी होती. दुसऱ्यांचा माल चोरताय, तो माल तरी चांगला चोरायचा ना. छत्रपती शिवाजी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, त्यांना मायणीत एक कोविड सेंटर दिलं होतं. महात्मा फुले योजनेच्या वेळी गोरेंच्या पत्नीशी संबंधित असणारं बँक अकाउंटचा नंबर दिला होता.

त्याकाळात 223 बिलं उचलली, तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. हायकोर्टने आदेश द्यायच्या अगोदरच जुजबी गुन्हा दाखल करून घेण्यात आला. या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. मात्र, गोरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. आभाळगात माया तुझी आम्हावर राहू दे, अशी पोस्ट घनश्याम सोनवणे नावाच्या पीएसआयने गुरु पौर्णिमेला केली आहे, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले.

त्या म्हणाल्या, सोलापूर विश्रामगृहातील दोन सूट फक्त पालकमंत्रीसाठी आहेत. 10 कोटी खर्च करून सुशोभीत केले आहेत, त्याचा वापर कशासाठी केला जातो, हे तुम्हीच पाहा. सोलापूर विश्रामगृहाच्या दोन सूटचे दरवाजे नेहमी बंद असतात, ते का असतात, याचीही उत्तर द्यावं.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचं उभ्या महाराष्ट्रात काय झालं, याच उत्तर मी तुम्हाला देते. या माणसाला गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात समन्स मिळणार असेल तर त्याला मंत्रिपदावर का ठेवायचं? किमान भाजपच्या निष्ठावंताना द्या; कारण शिंदेंच्या कोपऱ्याला तुम्ही गूळच लावणार आहात, असाही टोला अंधारे यांनी लगावला.

Jaykumar Gore-Sushma Andhar
Shivsena UBT : ठाकरेंच्या आमदाराची संपर्कप्रमुखांच्या बैठकीला दांडी; अंधारेंचा सूचक इशारा, ‘काय संदेश द्यायचा, तो मी दिलाय...’

ग्रामविकास खात्याचा कारभार कसा चालतो, हे विजय चौधरी याच्या ऑडिओ क्लिपमधून बाहेर आलं आहे. चौधरी हा भाजपचाच माणूस आहे. या वेळी सुषमा अंधारे यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये गोरे आपल्या कामाला 10 टक्के मागतायत, असं भाजपचाच माणूस सांगतोय. शिवसेनेच्या लोकांबाबत जपून बोलायचं; कारण तुम्ही एक वाक्य बोललात, तर मी अख्खी बखर बाहेर काढेन, असा इशाराही अंधारे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com