

Satara, 05 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधीचा ठराव करण्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सोसायट्यांमध्ये ठरावासाठी लगबग सुरू आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघ असलेल्या माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी विकास सेवा सोसायटीच्या ठरावात भाजपचे मंत्री गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांना पुन्हा धोबीपछाड दिली आहे. वरकुटे-मलवडी सोसायटीचा ठराव भाजपच्या बाजूने झाला आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेचा निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी वरकुटे-मलवडी (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटीचा ठराव ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने माजी सरपंच बाळकृष्ण दत्तात्रय जगताप यांच्या बाजूने सात विरुद्ध सहा मतांनी जिंकला. हा ठराव मंजुर होताच भाजप कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला.
सातारा जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विकास सेवा सोसायटीतील एका सदस्याला मतदानाचा अधिकार (ठराव) देण्यासाठी बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस अभयसिंह जगताप आणि सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा कुकुडवाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी वरकुटे-मलवडी सोसायटीची निवडणूक एकत्रितपणे लढवली होती.
या निवडणुकीत अभयसिंह जगताप, अनिल देसाई आणि भाजपचे बाळकृष्ण जगताप यांनी प्रत्येकी चार संचालकांची शिफारस करत पॅनेल उभे करीत तर एका संचालकाची सर्वांनुमते निवड केली होती.
ठरावावेळी अभयसिंह जगताप, तर मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित गटाकडून बाळकृष्ण जगताप यांनी दावा केला. त्यामुळे उपस्थित सदस्यांचे मतदान घेण्यात आले.
मतदानामध्ये सहा सदस्यांचा पाठिंबा अभयसिंह जगताप यांना पाठिंबा मिळाला, तर विरोधातील बाळकृष्ण जगताप यांच्या बाजूने सात जणांनी मतदान केले. यामुळे सात विरुद्ध सहा अशा फरकाने बाळकृष्ण जगताप यांच्या बाजूने ठराव मंजूर झाला.
या चुरशीच्या निवडणुकीत बाळकृष्ण जगताप यांनी विजय मिळविल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.