

Karad, 23 August : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक भाजप सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुती म्हणून तीनही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली पाहिजे, असे मत मांडले. पण ते सांगताना बॅंकेच्या निवडणुकीत महायुती झाली नाही तर आम्ही काय सोडून देणार आहोत काय? असा सवाल केला आहे, त्यामुळे सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महायुतीतच संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेप्रमाणे महायुतीमधील तीन पक्षांमध्ये पुन्हा एकदा चुरस रंगण्याची चिन्हे आहेत. भाजपला जिल्हा परिषदेप्रमाणे जिल्हा बॅंक ताब्यात घ्यायची आहे. त्यामुळे प्रचंड महत्वकांक्षी भाजपचे नेते आक्रमक व्यूहरचना करताना दिसत आहेत.
सातारा जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी मुख्य भूमिकेत असणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेच पुन्हा एका जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. त्याच दृष्टीकोनातून मंत्री गोरे यांनी भाष्य केले आहे. ते करताना गोरे यांनी सातारा जिल्हा बॅंक निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत.
जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे म्हटले आहे. गोरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे मंत्री सामंत यांना विचारले असता त्यांनी प्रथम सावध भूमिका मांडली. पण, जाता जाता त्यांनीही इशारा दिला.
सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक तीनही पक्षांनी महायुती म्हणून लढवली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवली जात नसेल तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांना त्याबाबत विचारले जाईल. आम्ही असं काय वाईट केलंय, म्हणून आम्ही तुमच्यासोबत नको, हे त्यांना विचारु. पण बॅंकेची निवडणूक महायुतीनं लढलं पाहिजे, अशी माझी भूमिका राहील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
सामंत म्हणाले, आम्ही निवडणुकीत भाजपला सहकार्य करतो. महायुतीमध्ये आम्ही काम करतोय. आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ. नाहीच झालं तर आम्ही काय सोडून देणार आहोत का?, पण शिवसेनेचे इथले नेते निवडणुकीबाबत ठरवायला सक्षम आहेत, त्यासाठी उदय सामंतची गरज लागत नाही.
सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास
आम्ही कोणाचाही पक्ष फोडलेला नाही. जे अशी वक्तव्य करत आहेत, ते दबाव आणत असतील. आम्ही काहीही वावगं केलेलं नाही. जे काही झाले आहे, ते त्यांच्या कर्माने झालं आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. आमच्या वकिलांनी आमची बाज मांडली असून आम्हाला न्याय मिळेल, अशा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.